बारामती : ‘‘विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करायला लागल्यापासून मी जितकी विकासकामे केली, तितकी कामे आगामी काळात कोणीच करू शकणार नाही. बारामतीकरांना माझ्यासारखा आमदार परत मिळणार नाही,’’ अशा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
बारामती येथील पंचायत समितीमध्ये आयोजित कार्यक्रमात रविवारी (ता.६) पवार बोलत होते. ते म्हणाले, ‘‘मी जेवढे काम केले आहे, तितके काम करणारा आमदार तुम्हाला या पुढील काळात मिळणार नाही, हा माझा दावा आहे. तुम्ही आजपर्यंत बारामतीचे प्रतिनिधित्व केलेले अनेक आमदार सुरुवातीपासून म्हणजे १९५२ पासून आजपर्यंत आमदार झालेल्या प्रत्येकाची कारकीर्द पाहा, कोणी किती काम केले, हे पाहा. तुम्ही मला १९९१ मध्ये आमदार म्हणून निवडून दिले. माझ्या कालावधीत किती काम झाले आहे. हे तुम्ही सर्वांनी पाहिले आहे. ही एवढी कामे करून मी थांबणार नाही,’’ असेही त्यांनी सांगितले.
१०० दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकलीदिव्यांग बांधवांचे जीवन सुकर करण्याकरिता अष्टावधानी संतुलन फाउंडेशनच्यावतीने १०० दिव्यांग नागरिकांना तीन चाकी इलेक्ट्रिक सायकलींचे वाटप करण्यात येत आहे. या माध्यमातून जंझिरे कुटुंबीय आपली सामाजिक बांधिलकी जपत दिव्यांग बांधवांना मदत करीत आहे, याबद्दल अजित पवार यांनी त्यांचे कौतुक केले.
अजित पवार म्हणाले...दिव्यांगांना स्वावलंबनासाठी लागणारी संसाधने आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यास ते देखील समाजाच्या मुख्य प्रवाहात योगदान देवू शकतात.
अर्थसंकल्पात सर्व जिल्ह्याकरीता जिल्हा वार्षिक योजनेसाठी २२ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
केंद्र आणि राज्य शासनाच्यावतीने शिष्यवृत्ती सुरू करण्यासाठी, कृत्रिम अवयव, साधने विकत घेण्यासाठी आणि स्वयंरोजगार अर्थसहाय्य योजना राबविण्याकरीता प्रयत्न करण्यात येईल.
राज्यातही केंद्राप्रमाणे दिव्यांगांना पदोन्नतीत आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दिव्यांगाना अधिक सोई-सुविधा मिळण्याच्यादृष्टीने विधायक सूचना कराव्यात
कार्यक्रमात अजित पवार म्हणाले की, बारामतीत कसलीही दादागिरी, गुंडगिरी बारामती खपवून घेणार नाही. शहरात गुंडगिरी करणाऱ्यांवर प्रसंगी मकोकाची कारवाई करू. दोन दिवसांपूर्वी एका युवकाला चार जणांनी जी बेदम मारहाण केली, त्याची व्हिडिओ क्लिप मी पाहिली आहे असली गुंडगिरी आणि दादागिरी खपवून घेणार नाही. पोलिसांना सांगून त्याच्यावर योग्य कलमे लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. अधिकाधिक कलमे लावून कायदेशीर कारवाईची सूचना अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड यांना केली आहे.
दिव्यांगांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाहीदिव्यांगांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पातील एक टक्का निधी राखून ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. आगामी काळात दिव्यांगांच्या सुविधासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही अजित पवार यांनी दिली.