उन्हाळ्याबद्दल बोलत असताना आईस्क्रीमचा उल्लेख न करणे जवळपास अशक्य आहे. उन्हाळ्यात थंड आइस्क्रीम खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो, मात्र काही वेळाने घसा कोरडा पडू लागतो आणि तीव्र तहान लागते. परंतुअसे का घडते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आईस्क्रीम थंड असते, मग ते खाल्ल्यानंतर इतकी तहान का लागते आणि ते खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे योग्य आहे का की काही वेळ वाट पहावी? या प्रश्नांची उत्तरे आजच्या या लेखातून जाणून घेऊयात.
आईस्क्रीममध्ये खूप प्रमाणात साखर असते. जेव्हा आपण जास्त गोड पदार्थ खातो तेव्हा आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते. याला नियंत्रित करण्यासाठी, शरीर पेशींमधून पाणी खेचते, ज्यामुळे आपल्याला तहान लागते. यामुळेच गोड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यावेसे वाटते.
कधीकधी आईस्क्रीमची चव वाढवण्यासाठी त्यात थोडे मीठ (सोडियम) देखील टाकलेले असते. जेव्हा शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते तेव्हा शरीराला ते संतुलित करण्यासाठी जास्त पाण्याची आवश्यकता असते, यामुळेही तहान लागते.
आईस्क्रीम थंड असले तरी ते डिहायड्रेशनला चालना देऊ शकते. त्यात असलेले दुग्धजन्य पदार्थ, साखर आणि फॅट्स शरीरातील पाण्याचे शोषण मंदावतात. त्यामुळे देखील पाणी प्यावेसे वाटू लागते.
जर तुम्हाला खूप तहान लागली असेल आणि वाट पाहणे कठीण वाटत असेल तर तुम्ही कोमट किंवा साधारण तापमानाचे पाणी पिऊ शकता. परंतु थंड पाणी पिऊ नका.
जर आईस्क्रीम मर्यादित प्रमाणात खाल्ले तर त्याने कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही, परंतु ते जास्त प्रमाणात खाल्ले गेले तर पचन समस्या, वजन वाढणे आणि डिहायड्रेशन सारख्या समस्या उद्भवू शकतात . विशेषतः लहान मुले आणि वृद्धांना थंड पदार्थांपासून दूर ठेवावे.
आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच थंड पाणी पिऊ नका.
आईस्क्रीम खाल्ल्यानंतर कोमट पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
जर तुम्हाला घशाचा त्रास असेल तर आईस्क्रीमपासून दूर राहा.
आठवड्यातून 2-3 वेळेपेक्षा जास्त आईस्क्रीम खाऊ नका.
नारळ पाणी किंवा लिंबू पाणी हे हायड्रेशनसाठी चांगले पर्याय असू शकतात.
हेही वाचा : Summer Beauty Tips : उन्हाळ्यातील स्किन केअरसाठी होममेड बॉडी लोशन
संपादित – तनवी गुडे