नाशिक- गरोदर मातेला वेळीच रुग्णालयात पोहचणे, प्रसूतीदरम्यान निर्माण झालेल्या गुंतागुंतीतून माता-शिशूला वाचविणे आदी विविध समस्या कधीकाळी उद्भवत होत्या. आज आधुनिक आरोग्य सुविधांमुळे हे प्रमाण आटोक्यात येत असले, तरी प्रसूतीपूर्व आणि त्यानंतरच्या काळातही माता-बालकांच्या आरोग्याचा प्रश्न कळीचा मुद्दा बनला आहे. सुदृढ राहण्यासाठी दोघांच्या सकस आहाराला प्राधान्य देण्याची आवश्यकता तज्नी व्यक्त केली.
जागतिक आरोग्य दिन सोमवारी (ता. ७) असून, ‘निरोगी सुरुवात, आशादायक भविष्य’ अशी यंदाची संकल्पना आहे. यंदाच्या वर्षीचा हा दिवस माता-शिशू स्वास्थाबाबत जनजागृतीसाठी समर्पित केला आहे. यानिमित्त जाणकारांशी संवाद साधताना स्थितीचा आढावा घेतला असता, आधुनिक काळासोबत आव्हानेदेखील बदलली असल्याचे समोर आले आहे.
आईच्या पोटात बाळाची वाढ होत असते. त्यामुळे गरोदर असताना व प्रसूतीयानंतरही विशेष काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. बऱ्याच वेळा शिशूची वाढ व्यवस्थित या होत नसल्याने कमी वजनाचे बाळ होणे, बाळाच्या आरोग्याची गुंतागुंत निर्माण होणे अशी आव्हाने उद्भवू शकतात. तसेच प्रसूतीनंतर पाच वर्षांपर्यंत बालकाच्या आरोग्याची विशेष काळजी घेणेदेखील तितकेच महत्त्वाचे ठरते. सुदृढ सुरुवात झाली, तर बालकाचे संपूर्ण आयुष्य आरोग्यसंपन्न होऊ शकते.
हे टाळणे महत्त्वाचे..
स्तनपान सुरू असेपर्यंत मातेने पथ्य पाळणे गरजेचे ठरते. यामध्ये फास्टफूड, जंकफूडचा आहार टाळावा. चौरस आहार घेताना बाळाच्या वाढीसाठीचे सर्व घटक आहारात असावे. मद्यपान, धूम्रपान सक्तीने टाळले पाहिजे. ग्रामीण भागामध्ये अद्यापही काही गैरसमज असून, यासंदर्भातही जागरुकता निर्माण होण्याची गरज आहे.
घरातील सर्वांचा सांभाळ करणाऱ्या महिलेने स्वतःच्या आरोग्याविषयी सजग राहिले पाहिजे. गर्भधारणेच्या काळात रक्तदाब, साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासह सुदृढ राहिल्यास बालकही सुदृढ राहते. नियमित तपासणी, सल्ल्यानुसार पथ्य पाळले पाहिजे. पौष्टीक आहाराला महत्त्व दिले पाहिजे.
- डॉ. निवेदिता पवार, स्त्रीरोगतज्ज्ञ.
शहरी भागात लहान मुलांमध्ये लठ्ठपणा तर ग्रामीण भागात कुपोषणाची समस्या आजही सामान्यरीत्या आढळते. या आरोग्य समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गरोदर काळापासूनच विशेष काळजी घेतली पाहिजे. सकस, पौष्टीक आहार माता आणि बालक दोघांच्या चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाचा ठरतो.
- डॉ. चंद्रकांत संकलेचा, स्त्रीरोगतज्ज्ञ.