ठाण्यातील जीर्ण इमारती धोकादायक
esakal April 07, 2025 11:45 PM

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : ठाण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या खारकर आळी परिसरातील एका इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील खिडकीचा भाग कोसळल्याची घटना रविवारी रात्री घडली. ही इमारत रिकामी असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली असून, इमारतीशेजारी असलेल्या दोन घरांतील नागरिकांचे अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
खारकर आळी परिसरातील ३८ वर्षे जुनी ओमसागर अपार्टमेंट इमारत चार मजली इमारत आहे. अतिधोकादायक स्थितीत असल्यामुळे तीन वर्षांपूर्वी ही इमारत खाली करण्यात आली आहे. अशातच चौथ्या मजल्यावरील एका खोलीच्या खिडकीचा काही भाग रविवारी रात्री कोसळला. खिडकीची लोखंडी ग्रील लटकत होती, तर बाजूचा उर्वरित भागदेखील धोकादायक स्थितीत आहे. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांसह, अग्निशमन दलाचे जवानांनी आढावा घेतला. या वेळी इमारतीच्या बाजूला असलेल्या घरातील नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव तात्पुरते स्थलांतरित केल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.