Petrol-Diesel : सरकारने वाढवले पेट्रोल-डिझेलचे उत्पादन शुल्क पण दरात फरक पडणार नाही? कसं समजून घ्या एका क्लिकमध्ये
esakal April 07, 2025 11:45 PM

Petrol-Diesel Price Hike: केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना मोठा झटका दिला आहे. कारण अचानक पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. पण यामुळं इंधनाच्या दरात वाढ होईल का? सविस्तर जाणून घेऊयात.

सोमवारी सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या एक्साईज ड्युटीमध्ये अर्थात उत्पादन शुल्कात वाढ केली आहे. त्यामुळं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क २ रुपयांनी वाढलं आहे. तर डिझेलवर देखील २ रुपये उत्पादन शुल्क वाढवण्यात आलं आहे. त्यामुळं पेट्रोल-डिझेलच्या दरात सोमवारी मध्यरात्री १२ वाजल्यानंतर वाढ होणार अशी चर्चा होती. पण पंपांवरील किरकोळ विक्रीच्या दरात कुठलीही वाढ होणार नसल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.

भारतात पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क हा केंद्र सरकारकडून लावण्यात येणारा कर आहे. याचा इंधनाच्या किंमतीवर मोठा परिणाम होतो. सध्या पेट्रोलवरील उत्पादन शुल्क हे १९.९०रुपये प्रतिलिटर इतकं आहे. तर डिझेरवर १५.८० रुपये प्रतिलिटर आहे. दरम्यान, २०१४ मध्ये पेट्रोलवरील उत्पादन शुल्क ९.४८ रुपये प्रतिलिटर इतकं होतं. तर डिझेलवर ३.५६ रुपये प्रतिलिटर इतकं होतं. त्यानंतर या दरांमध्ये अनेकदा वाढ झाली आहे.

सन २०२१ मध्ये पेट्रोल आणि डीझेलवर उत्पादन शुल्क २७.९० आणि २१.८० रुपेय प्रतिलिटर इतका होता. मे २०२२ मध्ये केंद्र सरकारनं दिलाशाच्या दृष्टीनं पेट्रोलवर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रुपयांची कपात केली होती. त्यानंतर हे दर लागू झाले आहेत. भारतात सध्या पेट्रोल-डिझेलची बेस प्राईस ३२ रुपये आहे. त्यावर केंद्र सरकार ३३ रुपये उत्पादन शुल्क वसूल करते. त्यानंतर विविध राज्यांकडून आपल्या हिशोबानं व्हॅट आणि सेस वसूल केला जातो. त्यामुळं पेट्रोल-डिझेलच्या किंमती दोन-तीन पटीनं वाढतात.

दरांबाबत सरकारनं दिलंय स्पष्टीकरण

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितलं की, "पेट्रोल आणि डिझेलवर उत्पादन शुल्क 2 रुपयांनी वाढणार आहे, अशी अर्थ मंत्रालयाची अधिसूचना तुम्ही पाहिली असेल. पण मी रेकॉर्डवर हे स्पष्ट करतो की, ही दोन रुपयांची वाढ ग्राहकांसाठी असणार नाही. कारण आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडची ऑईलची किंमत कमी झाली आहे. आमच्या कंपन्यांनी 60 डॉलरच्या आसपास तेलाचे दर कमी केले आहेत. 45 दिवसांच्या कालावधीत, कच्च्या तेलाची किंमत 83 अमेरिकन डॉलर इतकी होती, त्यानंतर ती 75 डॉलरवर आणण्यात आली आहे. त्यामुळं पेट्रोल-डिझेलचे किरकोळ विक्रीच्या दरात वाढ होणार नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.