Virar News: रामनवमीच्या रॅलीला गालबोट, अंडी फेकल्याचा आरोप; विरारमध्ये तणावाची स्थिती
Saam TV April 07, 2025 11:45 PM

वसई विरारमध्ये एक धक्कादायक घटना घडली. रामनवमीनिमित्त रॅली काढण्यात आली होती, या रॅलीवर काही अज्ञात समाजकंटकांनी अंडी फेकल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेनंतर काही काळ विरारमधील त्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थीती नियंत्रणात आणली. या प्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विले इमारतीजवळ राम नवमीनिमित्त शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभा यात्रेची सुरूवात विरारच्या चिखल डोंगरी येथून करण्यात आल्याची माहिती आहे. या शोभा यात्रेचे आयोजन सखल हिंदू समाजाद्वारे करण्यात आली होती. या यात्रेत हजारोच्या संख्येने भाविक मग्न होत रॅलीमध्ये सहभाग झाले होते.

मात्र, या शोभा यात्रेमध्ये एक आक्रित प्रकार घडला. काही अज्ञात लोकांनी रॅलीवर अंडी फेकल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही धक्कादायक घटना सायंकाळच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. काही अज्ञात व्यक्तींनी अंडी फेकल्यानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनेकांनी यात्रेदरम्यान रोष व्यक्त केल्याची माहिती आहे.

या घटनेनंतर तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच संबंधित तरुणाला बोळींज पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी या घटनेचा निषेध करत रोष व्यक्त केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.