6136
म्हाकवे : येथील कृष्णात पाटील गेली दहा वर्षे गावच्या माळरानावरील स्वच्छतेचे काम करत आहेत.
............
स्वच्छतेतून ‘पर्यावरण वाचवा’चा संदेश
म्हाकवेतील शिक्षक कृष्णात पाटील यांचा गेली दहा वर्षे उपक्रम
सकाळ वृत्तसवा
म्हाकवे, ता. ६ : येथील माध्यमिक शिक्षक कृष्णात पाटील गेली १० वर्षे अखंडपणे मद्यपींनी गावाच्या माळरानावर दारू पिऊन फेकलेल्या बाटल्या, प्लास्टिक आणि जेवणाच्या पत्रावळ्या एकत्र करून त्यांची योग्य विल्हेवाट लावत आहेत. तसेच ते वृक्षारोपणाचे काम करत आहेत. गेली दहा वर्षे त्यांनी निसर्गाला विद्रूप करणाऱ्या मानवी प्रवृत्तीला आपल्या कृतीतून ‘पर्यावरण वाचवा.. देश वाचवा’ संदेश दिला आहे.
२०१५ मध्ये पाटील यांनी या पर्यावरणपूरक कार्याला प्रारंभ केला. फिरायला गेल्यानंतर आजूबाजूचे दिसणारे हे दृश्य त्यांच्या मनाला पटले नाही. शाळेत धडे शिकवायचे पण कोरडी कृती कशाला, या निश्चयाने त्यांनी माळरानावरच्या अनेक बाटल्या, ज्या कधी फोडलेल्या तर कधी फेकलेल्या एकत्र करण्यास सुरुवात केली. फुटलेल्या काचेच्या बाटल्यांमुळे जनावरांना तसेच धावण्याचा सराव करणाऱ्या मुलांच्या पायांना जखमा होऊ शकतात. त्यामुळे त्यांनी फुटलेल्या बाटलीचे तुकडे वेचण्याचा संकल्प केला. तो आजही सुरू आहे.
रस्त्याकडेला नागरिकांनी टाकून दिलेले जुने अंथरूण, किराणा मालाच्या प्लास्टिक पिशव्या, रुग्णांच्या गाद्या यांची त्यांनी विल्हेवाट लावली. माळरानावर पडलेल्या रिकाम्या दारूच्या बाटल्या पाहिल्यानंतर तरुणाई व्यसनांच्या आहारी गेल्याचे प्रकर्षाने जाणवते. हे सर्व चित्र पाहिले तर तरुणाई सावरायच्या पलीकडे गेल्याचे भीषण वास्तव लक्षात येते.
शाळेत मुलांना पुस्तकी ज्ञान देताना स्वतःच्या अनेक पर्यावरणपूरक कृतीतून निसर्गाबद्दल जाणीव करून देता आली. दिवसेंदिवस पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवायचा असेल तर प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखायला हवी. तरच भविष्यात हा निसर्ग आपणा सर्वांना मुक्तपणे जगण्याचा आनंद देईल. पाटील यांचे गेली १० वर्षे पर्यावरणाच्या
दृष्टीने सुरू असलेले काम समाजाला प्रेरणादायी आहे.
..........
कोट...
माझी जबाबदारी म्हणूनच हे करतोय. उत्तम निवेदक, विषय मार्गदर्शक आणि विविध पुस्तकांचे लेखन अशा भूमिकेतून निसर्गपूजक झालो. शाळेत केवळ धडे शिकवायचे नाही, तर मुलांच्या मनावर बिंबवायचं, याच भावनेने निसर्ग स्वच्छतेची ओढ लागली.
- कृष्णात पाटील, माध्यमिक शिक्षक