मुंबई : ‘‘राज्यातील दिव्यांगांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असून त्यांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. दिव्यांगांच्या रोजगारासाठी धोरण तयार करण्यात येणार आहे. त्याबाबत रोजगार व स्टॉलचे धोरण तयार करण्याचे निर्देश कौशल्य विकास आणि उद्योग विभागाला दिले आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथिगृह येथे दिव्यांग बांधवांच्या विविध समस्यांबाबत बैठक पार पडली. जन्मजात किंवा काही कारणास्तव दिव्यांगत्व आलेल्या दिव्यांगांना आयुष्य जगत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दिव्यांगत्वावर मात करीत आपल्या जीवनात उत्कर्षाचा मार्ग शोधावा लागतो. अशा दिव्यांगांच्या आयुष्यात समृद्धी निर्माण करण्यासाठी कालसुसंगत नवनवीन योजना, धोरणांची निर्मिती करण्याचे निर्देश देत फडणवीस यांनी या धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
‘‘दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेत २०२५-२६ पासून प्रत्येक वर्षी नियमित योजनांसाठी अनुज्ञेय असलेल्या निधीमधून कमाल एक टक्का निधी राखीव ठेवला जाईल. दिव्यांगांसाठी सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा दिव्यांग भवन उभारण्यात येईल,’’ अशी माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.