Maharashtra Politics Live : दीनानाथ प्रकरणानंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर, खासगी रुग्णालयांना धाडली नोटीस
Sarkarnama April 08, 2025 02:45 PM
PMC : दीनानाथ रुग्णालय प्रकारणानंतर महापालिका अलर्ट मोडवर

पुण्यातील दीनानाथ रुग्णालयातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकारणानंतर पुणे महापालिका अलर्ट मोडवर आली आहे. त्यामुळे आता पालिकेने खासगी रुग्णालयांना देखील कोणतंही डिपॉझिट घेऊ नका, अशी नोटीस धाडली आहे. आधी उपचार करा आणि नंतर पैसे मागा, अशा संदर्भातले आदेश आता सर्व खासगी रुगणालयाला देण्यात आले आहेत. महापालिकेच्या या निर्णयामुळे इमर्जन्सी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Pratap Sarnaik : परिवहन मंत्री आज पालघर दौऱ्यावर

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज पालघर दौऱ्यावर जाणार आहेत. सूर्या धरण पाणी पुरवठा योजनेची पाहणी करण्यासाठी ते पालघरला जाणार आहेत. त्यानंतर ते पालघरमधील महामंडळाच्या बस स्थानकांची पाहणी करणार आहेत.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा हप्ता 30 एप्रिलला मिळणार

लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयाच्या मुहुर्तावर मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याचा हप्ता 30 एप्रिलला लाडक्या बहणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.

Deenanath Mangeshkar Hospital : डॉक्टरांनी राजीनामे देत जबाबदारी झटकली - वडेट्टीवार

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालाच्या भोंगळ कारभारामुळे तनिषा भिसे यांना जीव गमवावा लागल्याचं आता जवळपास स्पष्ट झालं आहे. अशातच आता डॉ. घैसास यांनी दीनानाथ रुग्णालयातील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. तर आरोग्य समितीच्या अहवालामध्ये रुग्णालयाने तनिषा भिसेंना वेळेत उपचार दिले नसल्याचं म्हटलं आहे. यावरून आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे धर्मदाय रुग्णालय असूनही रुग्णांकडून पैसे घेऊनच उपचार केले जातात. ही कोणती सेवा? हा कोणता धर्म? डॉक्टरांनी राजीनामे देत जबाबदारी झटकली, आणि आता पळवाट शोधण्याचे काम सुरु आहे! सरकार अजून तरी नक्की कशाची वाट बघत आहे? पुन्हा काही पळवाटा शोधायच्या आहेत की सरळ सरळ क्लिनचीट द्यायची आहे? असा सवाल त्यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमधून केला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.