ईडी कार्यालयांच्या बाहेर कॉंग्रेसचा निषेध
Marathi April 17, 2025 09:25 AM

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया-राहुल यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यास विरोध

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

काँग्रेसच्या नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडशी (एजेएल) संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी पहिले आरोपपत्र दाखल केले. या आरोपपत्रात सोनिया गांधी, राहुल गांधी, सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांची नावे आहेत. याच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुधवारी देशभरातील ईडी कार्यालयांबाहेर निदर्शने केली. दिल्लीतील पक्ष मुख्यालयासमोर निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्लीप्रमाणेच अन्य शहरांमध्येही काँग्रेस कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयांबाहेर निदर्शने करत गांधी परिवारावर होणाऱ्या कारवाईचा निषेध केला.

नॅशनल हेराल्डशी संबंधित प्रकरणाची सुनावणी 25 एप्रिल रोजी दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयात होईल. न्यायालयाने ईडीकडून या प्रकरणाची केस डायरीही मागितली आहे. 2012 मध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया, राहुल आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांशी संबंधित लोकांविरुद्ध या प्रकरणाची तक्रार केली होती. याप्रकरणी गेल्या आठवड्यातच तपासादरम्यान जप्त केलेल्या मालमत्तांवर कारवाई करण्यासाठी पावले उचलली आहेत. ईडीने दिल्ली, लखनौ आणि मुंबईतील 661 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी नोटीस बजावली होती.

2000 कोटींच्या मालमत्तेवर 50 लाख रुपयात कब्जा : ईडी

काँग्रेस नेत्यांनी एका कटाचा भाग म्हणून ‘यंग इंडियन’ या खासगी मालकीच्या कंपनीमार्फत ‘असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड’ची (एजेएल) 2,000 कोटी रुपयांच्या  मालमत्तेवर फक्त 50 लाख रुपयांत कब्जा मिळवला होता, असा ईडीचा आरोप आहे. या कंपनीत सोनिया आणि राहुल गांधी यांचे 76 टक्के शेअर्स आहेत.

काँग्रेस आणि भाजप आमने-सामने

नॅशनल हेराल्डच्या मालमत्तेची जप्ती हा कायद्याच्या नियमाचे वेश धारण करणारा राज्य पुरस्कृत गुन्हा आहे. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर काही जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करणे हे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडून सूडाचे राजकारण आणि धमकी देण्याशिवाय दुसरे काहीही नाही. तथापि, काँग्रेस आणि त्यांचे नेतृत्व गप्प बसणार नाही. सत्यमेव जयते, असा हल्लाबोल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजपवर चढवला आहे. भाजपनेही काँग्रेसवर जोरदार प्रतिहल्ला चढवला आहे. भ्रष्टाचार आणि सार्वजनिक मालमत्तेच्या लूटमारीत सहभागी असलेल्यांना आता त्याची किंमत मोजावी लागेल, असे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला म्हणाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.