कोलकता (पीटीआय) : प. बंगालचे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष शुक्रवारी संध्याकाळी वयाच्या साठाव्या वर्षी पक्षातील सहकारी रिंकू मजुमदार यांच्याशी विवाह करणार आहेत. हे दोघेही एकमेकांना २०२१ पासून ओळखत असल्याची माहिती त्यांच्या नजीकच्या लोकांनी दिली.
सकाळच्या फेरफटक्यादरम्यान त्यांची एकमेकांशी ओळख झाली. त्यानंतर हळूहळू ही ओळख वाढत गेली. कोलकत्यातील न्यू टाऊन येथील समारंभात हे जोडपे एकमेकांशी विवाहबद्ध होईल. भाजपचे प. बंगालचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांच्यासह पक्षाच्या नेत्यांनी घोष यांच्या घरी जात त्यांना शुभेच्छा दिल्या. वधूच्या बाजूने विवाहाचा प्रस्ताव दिल्या गेल्याचेही समजते. नुकत्याच झालेल्या आयपीएल सामन्याला घोष यांनी मजुमदार यांच्याबरोबर हजेरी लावली होती. त्याचवेळी दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. घोष अविवाहित असून मजुमदार यांचे हे दुसरे लग्न आहे. त्यांना एक मुलगाही आहे.
घोष हे तरूणपणापासून रा. स्व. संघाचे सदस्य आहेत. भाजपमध्ये २०१५ ला सक्रिय होण्यापूर्वी त्यांनी देशभरात विविध पदांवर सेवा बजावली आहे. भाजपचे प. बंगालचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यांच्या कार्यकाळात भाजप राज्यात माकपची जागा घेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून उदयास आला.
आईच्या इच्छेमुळे लग्नाचा निर्णयवयाच्या ६० व्या वर्षी लग्न करण्याबाबत वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिलीप घोष म्हणाले, की मी विवाह करावा, अशी माझ्या आईची इच्छा होती. त्यामुळे, तिच्या इच्छेचा मान राखण्यासाठी मी विवाहबद्ध होत आहे. मी राजकारणात पूर्वीसारखाच सक्रिय राहणार असून माझ्या वैयक्तिक आयुष्याचा राजकीय कारकिर्दीवर कोणताही परिणाम होणार नाही.