जपानी महिला अधिकाऱ्यावर लैंगिक छळाचा आरोप
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने (जेएनयू) आपल्या एका वरिष्ठ प्राध्यापकाला लैंगिक छळाच्या गंभीर आरोपांनंतर बडतर्फ केले आहे. जपानी दूतावासातील एका महिला अधिकाऱ्याचा विनयभंग झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ही घटना काही महिन्यांपूर्वी विद्यापीठाच्या एका कार्यक्रमादरम्यान घडली होती.
पीडितेने जपानला परतल्यानंतर तक्रार दाखल केली होती. एका व्याख्यानाच्या निमित्ताने सदर महिला भारतीय दूतावास आणि परराष्ट्र मंत्रालयामार्फत विद्यापीठात आली होती. जेएनयूच्या अंतर्गत तक्रार समितीने (आयसीसी) चौकशीनंतर आरोप सत्य असल्याचे आढळून आल्यामुळे विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने प्राध्यापकांच्या सेवा सर्व लाभांसह रद्द करण्याची शिफारस केली.
सदर प्राध्यापकाविरुद्धचा हा पहिलाच खटला नव्हता. आरोपी प्राध्यापकाविरुद्ध यापूर्वीही अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तथापि, आरोपी प्राध्यापकाला अपील करण्याचा अधिकार असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे. संबंधित प्राध्यापकाचे नाव आणि विभागाची माहिती अद्याप उघड झालेली नाही.