वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, युनेस्को
आंतरराष्ट्रीय वारशाच्या जतनात सहभागी असलेल्या युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये श्रीमद् भगवद्गीता आणि भरतमुनींचे नाट्याशास्त्र यांचा समावेश करण्यात आला आहे. भारतातील या कलाकृतींना युनेस्कोने दिलेल्या सन्मानामुळे संपूर्ण देशात आनंदाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते संस्कृती-पर्यटन मंत्री गजेंद्र शेखावत आणि कित्येक ग्रंथप्रेमींनी या निर्णयावर आनंद व्यक्त केला आहे.
भारताच्या सांस्कृतिक आणि तात्विक वारशाला ऐतिहासिक मान्यता देत श्रीमद् भगवद्गीता आणि भरतमुनींचे नाट्याशास्त्र यांचा युनेस्कोच्या मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये समावेश करण्यात आला आहे. युनेस्कोचा मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर हा जगातील महत्त्वाचा माहितीपट वारसा जतन करण्याचा आणि तो कायमचा उपलब्ध करून देण्याचा एक प्रयत्न आहे. या यादीत समावेश केल्याने भूतकाळातील या वारसा ग्रंथांचे जतन होण्यास मदत होईल. आतापर्यंत भारतातील 14 कलाकृती/ग्रंथ युनेस्कोच्या ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी ‘एक्स’वरून युनेस्कोच्या निर्णयासंबंधी माहिती दिली. हा जागतिक सन्मान भारताच्या शाश्वत ज्ञान आणि कलात्मक प्रतिभेचा उत्सव आहे. श्रीमद् भगवद्गीता आणि नाट्याशास्त्र ह्या प्राचीन काळातील कलाकृती साहित्यिक खजिन्यापेक्षा मौल्यवान आहेत. 18 एप्रिल म्हणजेच जागतिक वारसा दिनी याचा समावेश ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये होणे खूपच आनंददायी आहे, असे शेखावत यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून जगभरातील प्रत्येक भारतीयासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. भगवद्गीता आणि नाट्याशास्त्राने शतकानुशतके संस्कृती आणि चेतनेचे पोषण केले आहे. त्यांची अंतर्दृष्टी जगाला प्रेरणा देत राहतात, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले.
प्रेरणादायी ग्रंथांची युनेस्कोकडून दखल
भगवद्गीतेमध्ये 18 अध्यायांमध्ये 700 श्लोक आहेत. महाभारत काळातील हा एक अद्वितीय हिंदू धार्मिक ग्रंथ आहे. हे वैदिक, बौद्ध, जैन आणि चार्वाक अशा प्राचीन भारतीय धार्मिक विचारांचे मिश्रण आहे. ते कर्तव्य, ज्ञान आणि भक्तीच्या महत्त्वावर आधारित आहे. भगवद्गीता अनेक भाषांमध्ये अनुवादित झाली असून शतकानुशतके जगभर वाचली जाते. त्यामुळेच युनेस्कोने याची निवड आपल्या रजिस्टरमध्ये करत योग्य दिशेने पुढाकार घेतला आहे. दुसरीकडे, भरत मुनींचे नाट्याशास्त्र हे संस्कृत काव्यात्मक श्लोकांचा संग्रह आहे. नाट्या (नाटक), अभिनय, रस (सौंदर्यविषयक अनुभव), भाव (भावना), संगीत इत्यादी परिभाषित करणाऱ्या नियमांचा यात व्यापक दृष्टिकोन आहे. हा कलांवरचा एक प्राचीन विश्वकोशीय ग्रंथ आहे. हे भारतीय रंगभूमी, काव्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र, नृत्य आणि संगीत यांना प्रेरणा देते. हे दोन्ही ग्रंथ दीर्घकाळापासून भारताच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक वारशाचे मुख्य आधारस्तंभ आहेत.
‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’ 1992 मध्ये सुरू
मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर हा 1992 मध्ये युनेस्कोने सुरू केलेला एक आंतरराष्ट्रीय उपक्रम आहे. जगातील महत्त्वाच्या माहितीपट वारशाची ओळख पटवणे, त्यांचे जतन करणे आणि ते सर्वांसाठी उपलब्ध करून देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. हे एक आंतरराष्ट्रीय नोंदींचे दालन असून त्यामध्ये जगभरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक किंवा सामाजिक महत्त्व असलेले ऐतिहासिक दस्तऐवज, हस्तलिखिते, दुर्मिळ पुस्तके, छायाचित्रे, चित्रपट, ऑडिओ रेकॉर्डिंग इत्यादींचा समावेश आहे.
2024 मध्ये तीन कलाकृतींचा समावेश
2024 मध्ये रामचरितमानस, पंचतंत्र आणि सहृदयालोक-लोकना या तीन भारतीय साहित्यकृतींचा ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड कमिटी फॉर एशिया अँड द पॅसिफिक रिजन’ (एमओडब्ल्यूसीओपी) रजिस्टरमध्ये समावेश करण्यात आला. एकाचवेळी तीन भारतीय कलाकृतींचा समावेश करण्याची ती पहिलीच वेळ होती. ‘रामचरितमानस’ हे 16 व्या शतकात गोस्वामी तुलसीदास यांनी अवधी भाषेत लिहिले होते आणि ते भारतीय साहित्य आणि हिंदू धर्मातील महान ग्रंथांपैकी एक मानले जाते. तर पंचतंत्र हे पंडित विष्णू शर्मा यांच्या कथांचा संग्रह आहे.