Maharashtra News Live Updates : शेतकरी कर्जमाफीसाठी मंत्री विखे पाटलांच्या घरासमोर प्रहारचे आंदोलन
Saam TV April 12, 2025 09:45 PM
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. शिव पुण्यतिथी निमित्त किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केल्यानंतर ते दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी स्नेह भोजनास येणार आहेत. शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच राज्य व केंद्रीय मंत्री मंडळातील मंत्री हे देखील उपस्थित राहणार आहे. अमित शाह यांच्या तटकरे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या स्नेहभोजनामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाची चर्चा सुरू झाली आहे. मात्र याचा कुठलाही राजकीय संबंध नसल्याचं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान तटकरे यांच्या निवासस्थानी अमित शाह यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असून घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

उजनी धरणाची मृतसाठ्याकडे वाटचाल

- पुणे , सोलापूर आणि आहील्यानगर जिल्ह्यांसाठी महत्वाचे असणार्या उजनी धरणाची मृतसाठ्याकडे वाटचाल

- ⁠उजनीत केवळ १३ टक्के पाणीसाठा शिल्लक

- उपयुक्त पाणीसाठा केवळ ७ टीएमसी एव्हढाच शिल्लक

- ⁠तब्बल ६३ टीएमसी मृतपाणीसाठा शिल्लक

- ⁠आठवडाभरात उपयुक्त पाणीसाठा संपुन उजनीत मृत पाणीसाठाच शिल्लक राहणार

- ⁠त्यामुळे ऐन उन्हाळ्यात परीसरातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागणार

- ⁠सोलापूर शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनीचे काम सुरु आहे. हे काम जाणीवपूर्वक रखडवन्यात येत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप

भुसावळ शहरातील दगडी पुलाजवळ आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरातल्या रेल्वेच्या दगडी पुलाजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला असून या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह ताब्यात घेत ग्रामीण रुग्णालयात हलवला असून सदर व्यक्तीचा मृत्यू कशाने झाला याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे. याबाबत पोलिसांकडून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून शवविच्छेदनाच्या अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

हनुमान मंदिरात चोरीचा प्रयत्न

छत्रपती संभाजी नगर शहरात काल सायंकाळी सगळीकडे हनुमान जयंतीची जय्यत तयारी सुरू असताना भावसिंगपुरा परिसरातील पाटील खोऱ्यातील चिरीखाना हनुमान मंदिरात चोरीचा प्रयत्न झाला. पुजाऱ्याकडून घटनेची माहिती मिळताच या भागातील नागरिक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Shirur-अपघातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यु

सणसवाडी येथे रुग्णवाहिका व दुचाकी यांच्यात धडक झाल्याने झालेल्या भीषण अपघातात रुग्णवाहिकेतील रुग्णासह रुग्णाचे दोघे नातेवाईक आणि अन्य तिघे असे सहा जण गंभीर जखमी झाले होते. यात रुग्णाच्या एका नातेवाईकाचा व दुचाकी वरील एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.

खुलताबादच्या भाद्रमारोतीच्या दर्शनासाठी भाविकांच्या मध्यरात्री पासून रांगा

संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादच्या भाद्रमारोतीच्या दर्शनासाठी भाविकांच्या मध्यरात्री पासून रांगा लागल्या आहेत. प्रसिद्ध भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी रात्री अनेक हनुमानभक्त 'जय भद्रा'चा जयघोष करीत वेगवेगळ्या भागातून खुलताबाद येथे दर्शनासाठी पायी दाखल झाले आहेत. नवसाला पावणारा दक्षिणमुखी हनुमान म्हणून भद्रा मारुतीची ओळख आहे. राज्यभरातल्या वेगवेगळ्या भागातून दरवर्षी मोठ्या संख्येने हनुमान भक्त दर्शनासाठी येत असतात. हनुमान जयंती निमित्त एक दर्शनाची पर्वणी असते. त्यामुळे आज दिवसभर हनुमान भक्ताची मोठी गर्दी खुलताबाद मध्ये असणार आहे. मंत्री अतुल सावे आणि उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत आज पारंपरिक पद्धतीने आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर सुरू करण्यात आला आहे. हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर खुलताबाद परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त येणार आहे. महिनाभरापासून खुलताबादच्या कबरीवरून वाद उफाळून आलेला आहे त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी विशेष ती खबरदारी घेतली आहे.

Shirur-सुर्योद्याला हनुमान जन्मसोहळा

पहाटे सुर्योदयाच्या वेळीच गावातील पवनपुत्र हनुमान मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. "पवनसुत हनुमान की जय!" च्या जयघोषांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला दिसून आला.या मंगलप्रसंगी मंदिरात महापूजा आणि आरतीचे भव्य आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि मंत्रोच्चारांच्या पवित्र ध्वनीत भाविकांनी प्रभु हनुमंताचे दर्शन घेतले. गावातील लोकांसह अनेक बाहेरील भाविकांनीही या सोहळ्याला उपस्थिती लावून श्रद्धेची प्रचिती दिली.चैत्र पौर्णिमा ही हनुमान जयंती म्हणून संपूर्ण देशात साजरी केली जाते. भक्ती, निष्ठा आणि परंपरेचे प्रतीक असलेल्या या उत्सवाने चांडोह गावात धार्मिकतेचा आणि भक्तिभावाचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला

दक्षिण पुण्याचा पाणीपुरवठा १७ एप्रिलला बंद

कात्रज आगम मंदिर येथे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती तसेच राजमाता भुयारी मार्ग येथे स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत.

त्यामुळे येत्या गुरुवारी (१७ एप्रिलला) शहराच्या दक्षिण भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. ही दुरुस्तीची कामे झाल्यानंतर शुक्रवारी (१८ एप्रिलला) सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेत प्रथमच नव्या खासगी विद्यार्थ्यांना संधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) जुलै ऑगस्ट २०२५मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत फेब्रुवारी मार्चमधील परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी संधी दिली जात होती. मात्र, आता शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, या दृष्टीने नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही परीक्षा देण्याची संधी दिली जाणार आहे.

गर्भवती मृत्यूप्रकरणी पालिकेचा अहवाल, माता मृत्यू अन्वेषण समितीकडून उपचारांतील विलंबाची तपासणी

ईश्वरी (तनिषा) भिसे या गर्भवतीच्या मृत्यूची चौकशी महापालिकेची माता मृत्यू अन्वेषण समितीने केली होती. रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यास, तिला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यास आणि तिच्यावर उपचार करण्यास विलंब झाला किंवा कसे, याबाबतचा अहवाल समितीने तयार केला असून, तो केंद्र सरकारच्या कुटुंब कल्याण विभागाला सादर करण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

उष्माघाताचे राज्यात ३४ रुग्ण

राज्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली असून, अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या वर गेला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने उष्माघाताच्या रुग्णसंख्येतही वाढ होत आहे. राज्यात आतापर्यंत उष्माघाताचे २४ रुग्ण आढळले असून, सर्वाधिक रुग्ण बुलढाणा जिल्ह्यात आहेत.

राज्यात ११ एप्रिलपर्यंत उष्माघाताचे ३४ रुग्ण आढळून आले असून, त्यात बुलढाणा जिल्ह्यात सर्वाधिक ६ रुग्ण आहेत. नागपूर, गडचिरोली, परभणी प्रत्येकी ४ रुग्ण, जालना ३, लातूर, नाशिक, पालघर, वर्धा प्रत्येकी २ रुग्ण आणि नांदेड, धाराशिव, सांगली, ठाणे, रायगड प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.

विमान कंपनीचे निष्काळजीपणामुळे प्रवाशांना त्रास, पुणे लखनऊ विमान सहा तासांनी लेट

विमान कंपन्यांच्या निष्काळजीपणामुळे प्रवाशांना सहा तास पुणे विमानतळावर बसावं लागलं. पुणे ते लखनऊ 6E0338 हे विमान आधी दिनांक ११ एप्रिल रोजी दुपारी 12.55 वाजताचे होते. ते रद्द करून रात्री 00.10 वाजता म्हणजे 12/04/2025 रोजी करण्यात आले.

बच्चू कडूंना उशिरा जाग आली - आमदार रवी राणा यांचा

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे या प्रमुख मागण्यासाठी काल प्रहार संघटनेचे शहराध्यक्ष बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात अमरावतीमध्ये आमदार रवी राणा यांच्या घरासमोर प्रहार संघटनेच्या वतीने मशाल आंदोलन करण्यात आले.. यावेळी गळ्यात निळे दुपट्टे,हातात मशाल व भगवा झेंडा घेऊन यावेळी रवी राणा यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं, यावेळी स्वतः रवी राणा यांनी प्रहार संघटनेच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारलं, तर यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना रवी राणा यांनी बच्चू कडूंना टोला लगावला.. शेतकऱ्यासाठी अपंगासाठी आम्ही पूर्ण ताकतीने सोबत आहे पण खूप उशिरा जाग आली,बच्चू कडू स्वतः मंत्री होते सरकार मध्ये होते उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या जवळचे ते होते..सत्ता मध्ये असताना गोष्टी सोप्या झाल्या असत्या पण उशीर झाला तरी पण त्याच्यासोबत आहे असा टोला रवी राणा यांनी लगावला.

यवतमाळात कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहारचे कार्यकर्ते आक्रमक

रात्री बारा वाजता हातात पेटती मशाल घेऊन शेकडो शेतकरांन सह प्रहार कार्यकर्त्यांच्या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार किसनराव वानखेडे यांच्या घरावर मोर्चा नेत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस आमचे सरकार आले तर आम्ही महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असे अशाश्वसन दिले होते. त्या आश्वासनाची सरकारला आठवण करून देण्यासाठी , शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, पेरणी ते कापणी पर्यंतचे सर्व कामे एमआरजीएस मधून करावी, दिव्यांगाना प्रति महिना 6000 हजार रुपये मिळावा या मागण्यांना करिता आमदार च्या घरावर मशाल मोर्चा काढला.

Maharashtra News Live Updates : शेतकरी कर्जमाफीसाठी मंत्री विखे पाटलांच्या घरासमोर प्रहारचे आंदोलन

शेतकरी कर्जमाफी आणि शेतीमालाला हमीभाव या मागण्यांसाठी राहाता तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले.. मंत्री विखे निवासस्थानी नसल्याने त्यांच्या प्रतिनिधींनी मागण्यांचे निवेदन स्वीकारले.. यावेळी आंदोलकांनी विखे पाटलांच्या घरासमोर अपना भिडू बच्चू कडू... शेतकरी कर्जमाफी झालीच पाहिजे... अशा घोषणा दिल्या..

सांगली.. शेतकरी कर्जमाफीचा विविध मागण्यांसाठी इस्लामपूर आणि शिराळा मध्ये प्रहार संघटनेने केलं टेंभा आंदोलन

शेतकरी कर्जमाफी सह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटने कडून राज्यभर मध्यरात्री आंदोलन पुकारण्यात आलं होतं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आमदारांच्या घरासमोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान इस्लामपूर या ठिकाणी प्रहार संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयासमोर टेंभा आंदोलन करण्यात आले आहे. तर शिराळा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार सत्यजित देशमुख यांच्या घरासमोर परिसरात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांने गनिमी काव्याने टेंभा- मशाल आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी प्रहार च्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

हातात मशाल आणि गळ्यात भगवा व निळा ध्वज बांधून राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांसह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळावी त्याचबरोबर दिव्यांगांना शासकीय लाभ मिळावा,अशी मागणे घेऊन हातात मशाल घेऊन हे टेंभा आंदोलन करण्यात आले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.