तितिक्षा
esakal April 13, 2025 09:45 AM

वृक्षाच्या स्थितप्रज्ञतेनं समुद्रतटी बसलेल्या वृद्धाने श्वासाला लाटांची लय दिली आणि तो चांदणं निथळवत, नित्य जाग्या राहणाऱ्या गतकाळाच्या गर्द रानातले सुखस्मृतींचे पाणवठे शोधू लागला. सूर्य मावळत आला तेव्हापासून तो बसला होता पण तो नक्की कधी इथे आला ते मात्र त्याला नीटसं आठवत नव्हतं. वयाने माणसाची स्मृती क्षीण होते ही केवढी मोठी सोय.

मावळता सूर्य ज्याप्रमाणे व्रणही मागे न ठेवता निघून जातो, तशा स्मृतीही एकेक करून हलक्या पावलांनी निघून जातात. स्मृती संपल्यामुळे माणूस मरतो का? मरताना त्याच्यापाशी संपलेल्या आयुष्याची नेमकी कुठली आठवण शिल्लक राहते? अगदी त्याच्या प्राणाला गळामिठी घालून, बुडणाऱ्या जहाजाच्या कप्तानाप्रमाणे शेवटपर्यंत थांबणारी इमानी, जबाबदार आठवण कुठली?

रोज जाळूनही आजही माझ्याजवळ कितीतरी आठवणी शिल्लक आहेत. म्हणजे अजून काही काळ मरणाची वाट पाहावी लागणार. जगण्याची इच्छा संपूनही श्वासांच्या लाटा आत बाहेर ढकलत राहाव्या लागणार. स्मृती स्वत:सवे माणसाची आस संपवतात.

मला आस वाटते अजून. तू येशील !

म्हणून स्मृती जाळत जागा राहतो. वाट पाहतो.

माझी तितिक्षा फळास येईल काय?

डोगो माझाच आहे हे सिद्ध होईल काय? किमान त्याला काय वाटतं ते तरी कळावं मला. मग हा तिष्ठलेला जन्म वाहून जाईल. स्मृती बहुतेक सगळ्या त्याच्याच! माझ्या डोगोच्या! डोगो! देखणा, सुदृढ! जणू होमरच्या आद्य काव्यातला ओडिसियस! निधडा परागंदा राजा! त्यानंही स्वजनांची परीक्षा पाहिली पण अखेरी तो परत आला होता. यावं माणसानं परतून. मग त्याच्या येण्याचं काव्य होतं. येणाऱ्या प्रत्येक पिढीत गाता येतं.

डोगो जाऊन दहा वर्ष झाली. दहा वर्ष ?

मला जाणवलीच नाहीत. गेल्या दहा वर्षातली एकही आठवण माझ्याकडे नाही. आठवणीशिवाय काळाची ओळख कशी लावायची? डोगोच्या जन्मापासून तो निघून जाईपर्यंतच्या काळाचं आठवणींनी काळजावर गोंदण काढून ठेवलंय. त्या वीस वर्षातला दिवसन् दिवस आठवतो आपल्याला. ऊर्जेनं भारलेला हरेक दिवस. डोगो ऊर्जेचा झरा होता. जगण्याचं कारण होता. अन् मग अचानक कुठल्या प्रेरणेनं तो समुद्रात गेला? त्याला समुद्राचं वेड होतं हे खरं. अन् तो भयकारी सागरही डोगोचा लडिवाळ करी.

डोगो चिमुरडा होता तेव्हाची गोष्ट.

तिन्हीसांजेला कुठल्या तरी उनाड परदेशी वाऱ्यानं खिजवल्यामुळं चिडून समुद्र उधाणला होता. मार्थानं इतर कोळिणींप्रमाणेच घाईनं तीचा श्टाल आवरला. आज तसाही धंदा होणार नव्हताच. तिनं मासोळी भरली. आडवं फळकूट उचललं. त्याखालच्या विटा उचलून बाजूला ठेवेपर्यंत एवढा वेळ सामंताच्या शेडखाली उभा असलेला डोगो डोळे विस्फारून चित्कारत समुद्राकडे पळत सुटला. कुणाला काही कळायच्या आत तो पाण्यापर्यंत पोहोचला होता.

ठोका चुकवून काळीज धपापत जणू मार्थाच्या मुखात आलं. ती आ वासून दृश्य बघतच राहिली. पाच वर्षाचं एक पोरगं ऐन उधाणाला उराउरी भेटायला पळत होतं. काहीच क्षणात मूल दिसेनासं झालं. किनाऱ्यावर एकच गलका उडाला. मार्थाच्या डोळ्यात पाणी भरलं. ती मटकन खाली बसली. अन् आणखी काहीच क्षणांनी ती जादू झाली.

अचानक आलेली मिरगी संपल्यावर गात्रशैथिल्यानं अंग पसरावं तसा समुद्र भुईसपाट पसरला. त्याच्या पाण्यात खेळणारं गुडघाभर लेकरू स्वच्छ दिसू लागलं. ज्यांनी ते पाहिलं त्यांचा डोळ्यांवर विश्वास बसेना. मागाहून परतलेल्या नावांतील नाखव्यांनाही त्यांनी किनाऱ्यावर घडलेली कथा ऐकवली तशी ते सगळे चकित झाले. सायबू म्हणजे अनुभवी तांडेल.

तो म्हणाला, “आपली अखेर दर्यावर व्हावी आसं मला नेहमी वाटायचं. पन ती प्रत्यक्ष दिसल्यावर जीव गळाठला. नावंच्या चिरफाळ्या उडायच्या बाकी होत्या आनि तेवढ्यात चेटूक व्हावं तसा दर्या उसासून गप पडला. मैं सोचा, मैं तो परवरदिगार को याद तक नै किया। टायमच नै मिला रे। फिर ये तिलिस्मी जादू किसने किया? ये किनारे पे उछलकूद करके पूरा दर्या को शांत करनेवाला डोगो तो फरिश्ता हैं।” मग सायबूनं डोगोला बत्ताशे भरवले होते, रेवड्या घेऊन दिल्या होत्या.

जन्मताच पोहायला येत असल्यागत लहान वयातच डोगो दूरपर्यंत पोहत जात असे. “विश्वनाथ, हा एक दिवस इंग्लिश खाडी पोहून जाणार,” असं लोक म्हणत तेव्हा आपल्याला किती अभिमान वाटत असे. आगस्टिन, रूपेश, साबू, छोटू तांडेल, सायबूसारख्या नाखव्यांसोबत समुद्रात भात शिजवून खायचा सोस तर किती ! जो तो त्याला आपल्या नावेत घ्यायचा प्रयत्न करायचा. नन्हा फरिश्ता, लिटील एंजल आणि बाळकृष्ण अशी तीन गटांनी तीन नावंही दिली होती डोगोला.

मार्थानं कधी “लहान आहे” म्हणून काळजी केली तर फातिमाबी म्हणायची, “दर्याचं लेकरूए ते. त्याला काय बी नाय होतं.”

मार्था खुळावून हसायची मग आणि म्हणायची, “Lord Poseidon, forgive my child.” डोगोनं दोन-दोन रात्री जागून समुद्रातून आणलेले जिन्नस पकवताना तिला उरात पान्हा तटतटल्यागत व्हायचं. डोगोचे मुके घ्यायची मग किती. मार्थापासून लपवून एखादी अलवार

चिंबोरी मला द्यायचा. खोताकडे द्यायला. काही काळ देणं चुकवायचा तगादा कमी व्हायचा. विश्वनाथ समुद्राशी बोलत असल्यासारखा स्वतःशी बोलत होता. गतकाळाच्या रानात गुंतलेले प्राण सोडवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता. गेली दहा वर्ष तो हेच करत होता. तुझ्यामुळे तो निघून गेला असं म्हणत मार्था डोगोच्या विरहाने खंगली, यथावकाश गेली.

पण तिच्या ह्या आरोपानं त्याचं आयुष्यच अर्थहीन झालं. गावानं त्याला डोगोच्या जन्मापासूनच नावं ठेवायला सुरुवात केली होती. डोगो गेल्यावर तर त्यांनी त्याचं नावच टाकलं. एकटा सायबू बोलायचा त्याच्याशी. त्याला डबल रोटी खायला लावायचा. म्हणायचा, “तो कोलंबसागत नवी दुनिया शोदायला गेला आस्नार. उस्को दूर का दिखता था। सुनाई देता था । ये बंबईमें जाकू कौव्वे के माफिक झूठा चुगनेवालोंमेसे नै था रे वो. वो दूर गेला हैं! पर वो आएंगा रे। तेरेको लेने आएंगा।'

आणि अचानकच तो धास्तावून एकटक पाहत राहिला समुद्राकडे. कुणीतरी येत होतं पाण्यातून. निथळत, सुशेगात एकेक पाऊल उचलून पुढे टाकत. क्षण दोन क्षण तसेच गेले आणि मग मात्र म्हातारा 'डोगो, माय डोगो...' असं पुटपुटत धावत सुटला.

सावकाशीनं त्यानं डोगोला बाकड्यापाशी आणलं. बसवलं. एकमेकांशेजारी बसून ती दोघं एकमेकांना न्याहाळत राहिली काही काळ.

'तू काळवंडलास रे डोगो ! कुठे होतास? मला ठाऊक होतंच की तू येशील कधी ना कधी. मी असतानाच आलास ते बरं केलंस. नाहीतर मी फार पूर्वीच या दगडाखाली तुझ्यासाठी पत्र लिहून ठेवलं होतं.

आता मात्र त्याचा काहीच उपयोग नाही,” असं म्हणत हसत म्हाताऱ्यानं कुठलासा एक दगड उचलला आणि खाली ठेवलेला एक कागद उचलून फाडणार इतक्यात डोगोनं चपळाईनं तो हिसकावला आणि हसत म्हणाला, 'वाचू दे तरी.' 'अरे मी बोलणारच आहे की सगळं.' 'काही विसरलास तर?' असं म्हणत क्षणभर विचार करून डोगोनं कागदाची घडी खिशात ठेवली.

'तू बोल आधी. मी नंतर तपासून बघेन,' तो हसत म्हणाला. विश्वनाथ उसासला, 'छे! तेच कसं बोलता येईल ? घडीत असं तर घडीत तसं… माणसाचं काय खरं? आणि खरं तपासायचं कसं? क्षणोक्षणीच्या नव्या लाटा! त्यांचा कैवार कसा घ्यायचा? क्षणात पाणी पाणी होऊन विरणारी तप्त भावना परत तशीच तप्त होईलही पण कारण निराळंच असेल.

मानवी भावनांचे बुडबुडे फोडत बसता आयुष्य तेवढं सरतं. तू का आलास रे? आजच का आलास? तुला तुझ्या दोस्तानं, मार्थाच्या लॉर्ड पोसायडॅाननं अडकवून ठेवलं होतं का रे? का तू त्याच्या रागाला कारण झालास?' मार्था गेली, तीचं कॅाफीन उचलताना खोताचा गोपाळा डोगोऽऽऽ म्हणत भेकला.

म्हणाला, 'आज तरी डोगोनं यावं.' सायबूला साप चावला. तो मेल्यावर माणसांनी चर्चच्या बागेतून शोधून काढून साप मारला. सायबू बरोबर सापही पुरला. सगळ्या परमेश्वरांनी त्यांना तशी बुद्धी दिली म्हणे. पुरताना अश्विन म्हणाला, 'डोगो असता तर सायबू मेलाच नसता.'

सामंताची म्हातारी मरताना 'डोगोला माझ्या हातचं सुकटाचं कालवण आवडायचं,' घोकत होती. तिनं शेवटपर्यंत दिग्यानं बनवलेल्या मृत्युपत्रावर सही केली नाही. आता दिग्या सख्ख्या बहिणींशी कज्जे करतोय. दिग्याला वाटतं होतं की म्हातारी मरताना तू येशील आणि त्याला सही मिळवून देशील.'

'आज गावात काही नाही. काहीच उरलं नाही. उत्तरेश्वराच्या महोत्सवालाही फारसं कुणी येत नाही. ताड माड आणि वाकलेली म्हातारी माणसं बघून तुझा हा दोस्त सकाळ संध्याकाळ फेसाळत दात विचकतो.'

विश्वनाथ एकटा समुद्राकडं पाहत बसतो.

'तू का थांबलास डॅड,' डोगोनं मार्दवानं विचारलं,

विश्वनाथ गहिवरला.

'I was waiting for you…

तू मला न्यायला येशील अशी खात्री होती. तू लहान होतास पण सगळेच बोलायचे की तू माझा नाहीस. मला मात्र तू माझाच अंश आहेस याचा विश्वास होता. आज ह्या क्षणी तू मला न्यायला आल्यानं तो विश्वास साकार होताना पाहायला इतर कुणी नाही. निदान सायबू हवा होता. पण माणसाचा न्याय ही काळीज विरत नेणारी गोष्ट आहे.

खोताच्या सत्तेचा आधार सगळ्यांनाच होता. सगळ्यांचच तिथं बसणं बोलणं होतं. पण तुझा उजळ रंग पाहून त्यांनी मार्थाच्या चरित्रावर डाग दिला. कळवळली, तडफडली बिचारी. सगळ्यांविरुद्धचं भांडण माझ्याशी भांडत राहिली.

आमच्या भांडत्या घरात तू समुद्रावरचा शीतळ उधाणवारा आला होतास आणि तू गेलास तरी प्राण जात नाही याचा संताप करून ती तुझ्या जाण्याबद्दल मला बोल लावत राहिली. तू सांग मी काय करायला हवं होतं? थांबून राहिलो तुझी, मरणाची वाट पाहत. माणसाला हवं तेव्हा मरता येत नाही. त्याच्या मरणाला कारण लागतं. तुझ्या जाण्यात परत येण्याची आस जडली होती.

ती जीव जोजवत राहिली आजवर. You know, as somebody said, 'life is nothing but aimless waiting decorated with worthless achievements.' खरं म्हणजे प्रत्येकानं तुझ्यासारखं उधाणाला भेटायला धावून जावं, नवी दुनिया शोधत, स्वतःला शोधत भरकटायला हवं. आणि मग कधीतरी असचं सूर्य अस्ताला जात असताना अंतरीच्या आठवानं भारून परतायला हवं.

तेव्हा त्याचं हृदय इथल्या मर्त्य अज्ञानासकट साऱ्याच अस्तित्वाला स्वीकारणाऱ्या तितिक्षेनं भरलेलं असावं. तरच आयुष्याचं गाणं होईल. Welcome my Odysseus, Welcome!! डोगो शांत ऐकत होता.

त्यानं विश्वनाथाचा थरथरता हात हाती घेतं ओलाव्यानं म्हटलं, 'सगळंच तर बरोबर बोललास. निघायचं?' आधार देत म्हाताऱ्याला हात धरून तो समुद्रात आत नेत राहिला. आत, खूप आत. एकटा विश्वनाथ दिसेनासा होत होता तशी मार्था, सायबू, गोपाळा, फातिमा बी, आगस्टीन सगळेच सुखावले. ओझं उतरून शांत झाले.

आठवणीशिवाय काळाची ओळख कशी लावायची? डोगोच्या जन्मापासून तो निघून जाईपर्यंतच्या काळाचं आठवणींनी काळजावर गोंदण काढून ठेवलंय. त्या वीस वर्षातला दिवसन् दिवस आठवतो आपल्याला. ऊर्जेनं भारलेला हरेक दिवस. डोगो ऊर्जेचा झरा होता. जगण्याचं कारण होता. अन् मग अचानक कुठल्या प्रेरणेनं तो समुद्रात गेला? त्याला समुद्राचं वेड होतं हे खरं. अन् तो भयकारी सागरही डोगोचा लडिवाळ करी.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.