मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांची 345 वी पुण्यतिथी आणि शिवरायांच्या समाधीच्या जीर्णोद्धारास 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने किल्ले रायगडावर 12 एप्रिल रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला दोन दिवसीय दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमातून उपस्थितांना संबोधित करताना अमित शहा यांनी शिवाजी महाराजांचा वारंवार एकेरी उल्लेख केला. तसेच औरंगजेबाच्या कबरीचा उल्लेख समाधी असा केला. यावरून शिवसेना उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहा आणि महायुतीच्या सरकारवर सडकून टीका केली. महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांचा कडेलोट करणार असल्याचे सांगणाऱ्या फडणवीसांनी हिंमत असेल तर गृहमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करून दाखवावा, असे आव्हान संजय राऊत यांनी दिले. याप्रकरणी आता भाजपा संजय राऊतांवर टीका करताना दिसत आहे. (Ashish Shelar reply to Sanjay Raut for criticizing Amit Shah)
आशिष शेलार आज कोकण दौऱ्यावर होते. यावेळी आशिष शेलार यांना संजय राऊतांच्या वक्तव्याविषयी विचारण्यात आल्यावर कोण संजय राऊत? ठाण्याच्या इस्पितळात ज्याचं नाव नोंद करून ठेवलंय, भरती व्हायचा बाकी आहे, त्यांच्या प्रश्नाला काय उत्तर देणार. संजय राऊत आणि उबाठा सेनेवर हीच वेळ आलेली आहे. औरंगजेबच्या फॅन क्लबचे ते लोकं नेतृत्व करत आहेत. त्यामुळे औरंगजेबी फॅन क्लबच्या नेत्यांना आता आम्हीच म्हणजेच अमित शहा आणि त्यांचे सेवक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा खरा इतिहास सांगू. कारण संजय राऊत यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडे पुरावे मागितले होते. ते पाकड्या वृत्तीचे आधारू आहेत. त्यामुळे पाकड्या वृत्तीच्या संजय राऊत यांच्या आमचे सेवकच अंजन घालतील, अशी टीका शेलार यांनी केली.
हेही वाचा – Ajit Pawar : चुलत्याच्या कृपेने बरं चाललंय म्हणणारे अजितदादा म्हणतात, काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं
आशिष शेलार म्हणाले की, रायगडावर एवढा मोठा महोत्सव झाला. देशाचे गृहमंत्री अमित शहा आले होते. आपल्या महाराजांसमोर नतमस्तक झाले. आपच्या महाराजांचा इतिहास जगभर पसरला पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. स्वधर्म, स्वाभिमान यासाठी महाराजांना त्यांनी अभिवादन केलं. परंतु अशा गोष्टीमुळे त्यांच्या (संजय राऊत) पोटात जळजळ आणि मळमळ होणे स्वभाविक आहे. यासाठी संजय राऊतांना इसबगोल सप्रेम भेट देतो. कारण याला बोलावलं, त्याला बोलवलं नाही अशा गोष्टीला छिदानवृत्ती म्हणतात. आमच्या कोकणाच्या भाषेत फाटक्यात पाय घालणं म्हणतात. फाटक्यात पाय घालायच्या वृत्तीने एक दिवस ते फाटके होतील. तोंडाला येईल ते बडबडणाऱ्या लोकांसाठी केईएम रुग्णालयामध्ये एक उपचार करण्याचा प्रस्ताव सादर करणार आहे. त्यामुळे काही लोकांची तोंडं कायमची बंद होतील. गाढव मेहनत करतो, तशी आम्ही मेहनत करतो असेही संजय राऊत म्हणाले होते. या टीकेवर बोलताना आशिष शेलार यांनी तुम्ही गाढव म्हणून रहा, असा संजय राऊतांना टोला लगावला.
हेही वाचा – Gulabrao Patil : पालकमंत्री पदावरून आपापसात अनेक किरकोळ वाद झाले, पण…; काय म्हणाले गुलाबराव पाटील?