डोनाल्ड ट्रम्प दर: जगातील अन्य देशांवर आयात शुल्क लादण्याची घोषणा करुन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या या घोषणेमुळे जगभरातील भांडवली बाजार गडगडले होते. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅक्स धोरणाला (Reciprocal Tax) 90 दिवसांची स्थगिती दिली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा काय होणार, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) प्रशासनाकडून शनिवारी रात्री आणखी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार अमेरिकेकडून आकारल्या जाणाऱ्या आयात शुल्कातून स्मार्टफोन, संगणक आणि अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंना वगळण्यात आला आहे. त्यामुळे आता या वस्तूंवर अमेरिकेकडून आयात शुल्क आकारले जाणार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या कचाट्यातून या वस्तूंना मुक्ती मिळाली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकन बाजारपेठेत येणाऱ्या जगातील अन्य देशांच्या उत्पादनांवर आयात शुल्क लादण्याची घोषणा केली होती. यामध्ये भारतावर 26 टक्के कर लादण्यात आला होता. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या या घोषणेचे अमेरिकेत विपरीत पडसाद उमटले होते. आयात शुल्क लादल्याने अमेरिकन बाजारपेठेत बाहेरुन येणाऱ्या वस्तुंची किंमत वाढली होती. याचा अमेरिकन नागरिकांना फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागू नयेत म्हणून काही गोष्टी टॅरिफच्या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला.
ॲपल, सॅमसंग यांच्यासारख्या बड्या कंपन्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचे स्वागत केले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे ॲपल, सॅमसंग या कंपन्यांच्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची अमेरिकन बाजारपेठेतील किंमत कैकपटीने वाढली असती. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांची चीनबाबतची कठोर भूमिका कायम आहे. ट्रम्प यांनी जगातील अन्य देशांवरील रेसिप्रोकल टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती दिली होती. मात्र, चीनवरील 145 टक्के कर कायम आहे. चीनकडूनही अमेरिकेला जशास तसे प्रत्युत्तर देण्यात आले असून त्यांनी अमेरिकन उत्पादनांवर 124 टक्के कर लादला आहे.
स्मार्टफोन, लॅपटॉप, संगणक, हार्ड ड्राईव्ह, कम्प्युटर प्रोसेसर आणि मेमरी चिप्स या वस्तुंवर रेसिप्रोकल टॅक्स लागणार नाही. यापैकी बहुतांश उत्पादनांची निर्मिती अमेरिकेत होत नाही. या वस्तुंचे अमेरिकेत उत्पादन करण्यासाठी कारखाने तयार करायचे झाल्यास त्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. याशिवाय, आयात शुल्कातून सेमीकंडक्टर तयार करण्याच्या मशिन्सलाही वगळण्यात आले आहे. यामुळे तैवान सेमीकंडक्टर मॅन्यूफॅक्चरिंग कंपनीला (TSMC) मोठा फायदा होणार आहे.
भारतातील चेन्नईत फॉक्सकॉन कंपनीचा प्लांट आहे. याठिकाणी आयफोन्स तयार केले जातात आणि जगभरात पाठवले जातात. तर गुजरातच्या सानंद येथे आगामी काळात फॉक्सकॉन कंपनीचा सेमीकंडक्टर चीप निर्मितीचा कारखाना उभा राहणार आहे. त्यामुळे भारतालाही काही प्रमाणात ट्रम्प सरकारच्या नव्या निर्णयाचा फायदा मिळेल.
https://www.youtube.com/watch?v=vl_lxyt1tnk
आणखी वाचा
अधिक पाहा..