तहावर राणाचा आवाज नमुना घेण्यासाठी निया
Marathi April 14, 2025 12:27 PM

राणाची परवानगी आवश्यक : कसून चौकशी करण्याचे एनआयए अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरूच

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) अधिकाऱ्यांनी रविवारी तिसऱ्या दिवशीही 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याची चौकशी सुरू ठेवली होती. त्याच्यावरील आरोप अधिक भक्कमपणे सिद्ध करता यावेत यासाठी एनआयए अधिकाऱ्यांकडून तहव्वूर राणाच्या आवाजाचे नमुने घेतले जाऊ शकतात. या नमुन्यांच्या आधारे 26 नोव्हेंबर 2008 च्या हल्ल्यादरम्यान तहव्वूर फोनवरून सूचना देत होता का, हे एनआयए शोधून काढेल. आवाजाचा नमुना घेण्यासाठी तहव्वूरची संमती आवश्यक असेल. मात्र, त्याने नकार दिल्यास एनआयए न्यायालयात दाद मागून त्याच्या आवाजाचे नमुने मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

दुबईमध्ये राणा ज्या व्यक्तीशी बोलला होता त्याला हल्ल्याबद्दल काही माहिती होती की नाही हे शोधण्यासाठी एनआयए टीम आता आरोपी तहव्वूर राणाचा आवाज नमुना घेण्याची तयारी करत आहे. अशा परिस्थितीत, राणाच्या आवाजाचा नमुना आवश्यक असेल. यासाठी एनआयएला राणाची परवानगी घ्यावी लागेल. जर राणाने नमुना देण्यास नकार दिला तर एनआयएला दुसरा मार्ग स्वीकारावा लागेल. राणाने एनआयएला आपल्या आवाजाचा नमुना देण्यास नकार दिला तर पथकाला त्यासाठी प्रथम न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल. जेव्हा न्यायालय आवाजाचे नमुने घेण्याची परवानगी देईल तेव्हाच या दिशेने काम पुढे जाऊ शकते. कॉल डिटेल्सची देखील तपासणी केली जाईल. जर आवाजाचे नमुने जुळले तर कटाबद्दल काहीतरी शोध लागण्याची शक्यता वाढेल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शनिवारी एनआयएच्या चौकशीदरम्यान एका ‘कर्मचारी बी’ चे नाव समोर आले होते. सदर व्यक्तीने राणाच्या सांगण्यावरून हेडलीला ऑपरेशन्स आणि लॉजिस्टिक्समध्ये मदत केली होती. आता एनआयए राणा आणि ‘कर्मचारी बी’ यांना समोरासमोर बसवून चौकशी करेल. तपास यंत्रणांच्या मते ‘कर्मचारी बी’ला दहशतवादी कटाची माहिती नव्हती. तो राणाच्या सूचनेनुसार हेडलीसाठी स्वागत, वाहतूक, निवास आणि कार्यालयाची व्यवस्था करत असल्याची माहिती पुढे आली आहे. राणाचा पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशी जवळचा संबंध होता आणि त्याला पाकिस्तानी लष्कराच्या गणवेशाची विशेष आवड होती, असेही समोर आले आहे. शुक्रवारी पहिल्या दिवशी एनआयएने त्यांची तीन तास चौकशी केली. एनआयए तहव्वूरच्या कुटुंब आणि मित्रांबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करत आहे.

प्रत्यार्पण रोखण्यासाठी 33 आजारांचा उल्लेख

भारतात होणारे प्रत्यार्पण टाळण्यासाठी राणाने 21 जानेवारी रोजी अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाला एक पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये 33 आजार आणि भारताकडून होऊ शकणाऱ्या संभाव्य छळाचा उल्लेख करण्यात आला होता. राणा पार्किन्सन, हृदयरोग, मूत्रपिंड निकामी होणे, दमा, टीबी आणि मूत्राशयाचा कर्करोग यासह अनेक गंभीर आजारांनी ग्रस्त असल्याचा दावा राणाच्या वकिलाने केला होता. राणा मुस्लीम आणि पाकिस्तानी वंशाचा असल्याने त्याला भारतात छळाचा सामना करावा लागू शकतो, असा दावाही त्यांनी केला. परंतु अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने 11 फेब्रुवारी रोजी प्रतिसाद देत हे दावे फेटाळून लावले. त्यामुळेच पुढे सर्व आंतरराष्ट्रीय नियमांनुसार राणाचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आले होते.

तहव्वूर राणा सध्या एनआयए कोठडीत

राणाला लोधी रोड येथील एनआयए मुख्यालयाच्या उच्च सुरक्षा असलेल्या तळमजल्यावरील 14×14 फूट कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर 24 तास रक्षक आणि सीसीटीव्ही द्वारे लक्ष ठेवले जाते. त्याला फक्त एक मऊ टिप पेन देण्यात आला आहे जेणेकरून तो स्वत:ला इजा करू शकणार नाही. एनआयए कोठडी पूर्ण झाल्यानंतर राणाला दिल्लीतील तिहार तुरुंगात उच्च सुरक्षा वॉर्डमध्ये ठेवले जाईल. मात्र, त्याला कधी आणि कोणत्या वॉर्डमध्ये ठेवले जाईल याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.