शरद पवार: राज्यातील 8 लाख महिलांना ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’अंतर्गत 1000 रुपये मिळत असल्याने त्यांना मिळणारा ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेचा 1500 रुपयांचा मासिक हप्ता कमी करून फक्त 500 रुपये देण्याचा राज्य सरकारचा निर्णय अन्यायकारक नाही का? असा सवाल राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं केला आहे. राष्ट्रवादीच्या ट्वीटरवर पोस्ट शेअर करत सरकारवर टीका करण्यात आली आहे. निवडणुकीपूर्वी 2100 रुपयांचा हप्ता देऊ, अशी वल्गना करणारे महायुती सरकार आज 2100 रुपये तर सोडाच, पण मासिक 1500 रुपयेही वेळेवर देत नाही. याउलट ते अजून कसे कमी होतील यासाठी नवनव्या क्लृप्त्या शोधत आहेत. महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची ही घोर फसवणूक असल्याचे ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील पात्र 8 लाख महिलांना 500 रुपयेच मिळणार असल्याची चर्चा सुरु आहे. नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहिण योजना अशा दोन्ही योजनांचा लाभ घेणाऱ्या या 8 लाख महिलांना लाडकी बहिण योजनेचे 500 रुपयेच मिळणार असल्याचं म्हटलं जात आहे. यामुळं महिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, यावरुन विरोधकांकडून जोरदार टीका देखील होताना दिसत आहे. आर्थिक सक्षम असलेल्या महिलांनी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतल्यानं त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्याकडून पैसेही वसूल करण्यात आल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय. याबाबत राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कोणत्याही महिलांवर गुन्हा दाखल केला नसून, वसुली केलेली नाही, विरोधकांकडून भ्रम पसरवला जात असल्याचे जयस्वाल म्हणाले.
विधानसभा निवडणुकीआधी लाडकी बहीण योजना सुरु झाली तेव्हा महिलांना सरसकट लाभ देण्यात आला होता. यात पात्र, अपात्र अशा दोन्ही प्रकारच्या महिलांनी अर्ज केले. पण विधानसभा निवडणुकीनंतर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळणाऱ्या महिलांची कागदपत्र पडताळणी केली. यातून अपात्र ठरलेल्या महिलांना योजनेच्या लाभातून वगळले. आता पात्र व्यक्तींनाच स्टायपेंड मिळणार आहे. ऑक्टोबरमध्ये या योजनेसाठी 2.63 कोटी अर्ज आले होते. तपासणी प्रक्रियेनंतर ही संख्या 11 लाखांनी कमी झाली. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत 2.52 कोटी महिला लाभार्थ्यांना योजनेचे पैसे मिळाले. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये अंतिम स्टायपेंड 2.46 लाख लाभार्थ्यांना देण्यात आला. यातूनही आता नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्यांना 1500 रुपयाऐंवजी फक्त 1000 रुपये मिळणार असल्याचं बोललं जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..