डॉ. मालविका तांबे
ग्रीष्म ऋतू आला की सगळ्यांना उष्णता सहन होईनाशी होते. कधी एकदा तापमान कमी होते व वातावरण सुखावह होईल असे वाटू लागते. पण उष्णता इतकी वाईट असती तर निसर्गाने तिचे अस्तित्व ठेवले नसते असे वाटते. आयुर्वेदामध्येसुद्धा पदार्थांच्या गुणांची चर्चा करत असताना उष्णता ही गुण म्हणून सांगितलेली आहे, अवगुण नव्हे. त्यामुळे उष्णता या गुणाला शरीरात कसे वापरावे की तिचा आरोग्यासाठी उपयोग होऊ शकले हे आपण आज बघू.
आयुर्वेदानुसार वात, पित्त व कफ हे तीन प्रकारचे दोष आपल्या शरीराच्या सर्व चयापचय क्रिया सांभाळत असतात. वात व कफ हे शीतल गुणाचे असतात तर पित्त उष्ण गुणाचे असते. प्राणीजगतात उष्ण रक्त असलेल्या प्राण्यांची संख्या जास्त आहे. अर्थात शरीरातील सर्व चयापचय क्रिया नीट चालवण्याच्या दृष्टीने एका विशिष्ट तापमानाची आवश्यकता असते. वातावरणात काहीही बदल झाले तरी शरीराचे तापमान टिकवून ठेवल्याशिवाय कुठलीही चयापचय क्रिया नीट होऊ शकत नाही. त्यामुळे पित्तदोषाचे कार्य प्रत्येक चयापचय क्रियेसाठी आवश्यक असते. याविरुद्ध वात व कफ हे शरीरात शीतलता आणतात.
अर्थातच शरीरात जेव्हा संतुलन असते तेव्हा पित्ताच्या कार्यातून शरीरात उत्पन्न होणारी अतिरिक्त उष्णता कमी करायला वात व कफदोष मदत करतात. उष्णता व शीतलता यात चाललेला हा खेळ आपल्या कोणाच्याही लक्षात येत नाही. फार जास्त गरम वातावरणात राहिलेल्या व्यक्तीला द्रवपदार्थांचा पुरवठा योग्य प्रमाणात केला तर शरीराला बाहेरच्या उष्णतेशी जुळवून घेणे सोपे जाते. पण थंड प्रदेशात नुसत्या आहाराने शरीराचे तापमान संतुलित ठेवणे अवघड जाते, पर्यायाने व्यक्तीला लगेच त्रास होताना दिसतो. हीट स्ट्रोक व फ्रॉस्ट बाइट या दोन्हींचेही शरीरावर विपरीत परिणाम होतात पण त्यातल्या त्यात शरीराला उष्णतेशी जास्त लवकर संतुलन साधता येते.
उदा. थंडीत गरम पाणी पिण्याची सवय सर्वांना लाभदायक ठरते, यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहायला मदत होते तसेच पचनाला सुद्धा मदतरूप ठरते. तरी उन्हाळ्याचा दिवसांत गरम पाणी पिणे बऱ्याच लोकांना सहन होऊ शकते, पण उन्हाळ्यात गार पाणी पिणारी व्यक्ती थंडीच्या दिवसांतही गार पाणी पीत राहिल्यास मात्र त्रास होताना दिसतो. आपल्या शरीराला तापमाननियंत्रणासाठी फार झगडावे लागणार नाही यासाठी सामान्य तापमानाचे वा कोमट पाणी पिणे शरीरस्वाथ्यासाठी उत्तम ठरते. हाच नियम स्नानाच्या पाण्याच्या बाबतीतही लागू पडतो.
शरीरात होणारे तापमानाचे बदलशरीरात कुठलेही संक्रमण झाल्यास जेव्हा आपली रोगप्रतिकारशक्ती आगांतुक कारणांशी लढत असते तेव्हा शरीराचे तापमान वाढते. यालाच ज्वर म्हटले जाते. शरीराचे तापमान वाढल्यामुळे शरीरात आलेला बॅक्टेरिया वा व्हायरस तग धरू शकत नाहीत, पर्यायाने इन्फेक्शन कमी व्हायला मदत मिळते. त्यामुळे ताप येणे हा उष्णतेचा आपल्या शरीरासाठी एक फायदा म्हणावा लागेल. पण ताप कशामुळे येतो आहे हे पाहून त्यावर उपाय करण्यऐवजी आधी केवळ ताप उतरवण्याचा बहुतेक वेळा प्रयत्न केला जातो.
जेव्हा ताप कमी असतो तेव्हा शरीराचे तापमान उतरवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा पादाभ्यंग करणे, प्रवाळपंचामृत, सूतशेखर रस वगैरेंसारखी थंडावा आणणारी पण संक्रमणाशी लढा देणाऱ्या शरीराचे तापमान कमी करणार नाही अशा प्रकारची मदत जास्त प्रभावी ठरते. खूप उच्च ताप असल्यास तो मात्र आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असते. त्यामुळे ताप उतरण्यासाठी कधी प्रयत्न करावे याचे भान ठेवणे आवश्यक असते.
लघवी, मल व घाम या तीन गोष्टींमार्फत शरीराची स्वच्छता होत असते. शरीरात उष्णता व्यवस्थित प्रमाणात असली तर शरीर स्वच्छ करण्याचे कामही व्यवस्थित होते. रुग्ण त्यांच्या त्रासाचे वर्णन करत असताना लघवी गरम होते, शौचाला गरम होते, घाम जास्त प्रमाणात येतो असे बऱ्याचदा सांगतात. अशा वेळी उष्णतेवर काम करणे आवश्यक असते.
सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे शरीरात होणारे पचन उष्णतेवर अर्थात पित्तावर अवलंबून असते. दीपन अर्थात शरीरातील अग्नी व्यवस्थित वाढवणे तसे पाचन अर्थात खाल्लेल्या अन्नाचे नीट पचन होणे ही दोन्ही कार्य उष्णतेच्या हातात असतात त्यामुळे पोटात एका निश्र्चित मर्यादेपर्यंत अग्नी असणे आवश्यक असते.
सध्याच्या काळात अल्कलाइन अन्न घेण्याचे प्रमाण वाढते आहे. त्यामुळे अपचनाचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाढलेला दिसत आहे. अग्नी व्यवस्थित जळत राहायला हवा या दृष्टीने यज्ञात समिधा घालायची असते त्याप्रमाणे खाल्लेले अन्न पचवायचे असेल तर शरीरात पित्ताची उष्णता माफक प्रमाणात असणे आवश्यक असते. उष्णता कमी असल्यास शरीरात आम तयार होतो व त्यामुळे शरीरातील स्रोतसांमध्ये अवरोध उत्पन्न होऊन वेगवेगळ्या प्रकारचे आजार तयार होतात.
त्यामुळेच आपल्याकडे गरमीच्या दिवसात थंडाई करत असताना काळी मिरी वापरणे गरजेचे असते असे सांगितलेले आहे. त्यामुळे शीतलतेबरोबरच शरीरात दीपन, पाचनाला मदत करणारी मिरी पोटात गेली तर पचनाचे संतुलन व्यवस्थित राहायला मदत मिळते.
च्यवनप्राश उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खाऊ नये असा सल्ला बऱ्याचदा दिला जातो, पण च्यवनप्राश वर्षभर खाण्याजोगे रसायन आहे. च्यवनप्राश व धात्री रसायनांसारख्या रसायनांमध्ये आवळा मनुका या गोष्टी शीतलता देणाऱ्या असतात. यामुळे रसायननामध्ये शीतलता व उष्णता असल्यामुळे ते संतुलित व्हायला मदत मिळते व त्यामुळे ते वर्षभर खाण्यायोग्य असते.
त्रिफळ्यासारख्या लोकप्रिय औषधातही हरीतकी व बिभीतकी ही दोन द्रव्ये उष्णवीर्य असतात तर आवळा शीतवीर्य असल्यामुळे त्रिफळा वर्षभर उपयोगात आणता येतो.
डोळ्यांमध्ये आलोचक पित्त अर्थात उष्णता नसली तर आपल्याला काहीही बघणे अवघड होत जाते. जसजशी उष्णता कमी होते तसे कफ व वात वाढून मोतीबिंदूसारखे दृष्टिपटलाचे वेगवेगळे आजार होऊ लागतात. डोळ्यांतील उष्णता संतुलन राहावा यासाठी निसर्गाने अश्रूंची योजना केली आहे. तसेच डोळ्यांवर गुलाबपाण्याच्या घड्या ठेवणे, सुनयन तेलासारखे तेल डोळ्यांत घालणे, नियमित अंजन करण वगैरे उपाय आयुर्वेदात संगितलेले आहेत.
शरीरात उष्णता संतुलित राहण्यासाठी काही उपाय...१. सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना डोक्यावर टोपी, छत्री वगैरे असलेले उत्तम.
२. वेळेवर आहार घेणे, यामुळे पाचनाग्नीचे कार्य व्यवस्थित राहायला मदत मिळते.
३. आहारात तूप, काळ्या मनुका, काकडी, भिजवलेले बदाम, जिरे, धणे, खजूर वगैरेंचा समावेश नक्की असावा.
४. धणे-जिऱ्याचे पाणी घेतल्याने पचन व्यवस्थित राहते तसेच शरीरात अतिरिक्त उष्णता तयार होत नाही.
५. नारळाचे पाणी, ओल्या नारळाचा चव आहारात वापरणे उत्तम ठरते.
६. शक्य असल्यास पिण्याचे पाणी जलसंतुलन घालून २० मिनिटे उकळल्यावर सामान्य तापमानाला आल्यावर प्यावे. यामुळे शरीरात पित्ताचे कार्य व्यवस्थित होऊन पचन व्यवस्थित होते तसेच शरीराला आवश्यक शीतलता मिळते. पाणी उकळत असताना त्यात थोडा कापूर घातल्यास चालू शकते.
निसर्गात सूर्य नसता तर पृथ्वीवर आयुष्य सुरू झाले नसे, तसे आरोग्यासाठी आपल्या शरीरात उष्णतेचे एक ठराविक प्रमाण असणे आवश्यक असते याचे भान ठेवून आपला आहार व आचरण ठेवणे उत्तम.