एआय आय…ओय ओय!
esakal April 18, 2025 11:45 AM

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे. वेळ : सुबह.

राजाधिराज उधोजीमहाराज अतिशय आनंदाने येरझारा घालत आहेत. मधूनच ‘जीतम जीतम’ अशा आरोळ्या ठोकत आहेत. कुणातरी अदृश्य व्यक्तीवर अदृश्य तलवारीचे घाव घालून खांडोळ्या उडवत आहेत. कमरेत खोचून ठेवलेली गाजरे कराकरा खात आहेत. एकंदरित हर्षभरित सकाळ आहे. अब आगे…

उधोजीराजे : (गर्रकन मान वळवत) कोण आहे रे तिकडे?

संजयाजी फर्जंद : मुजरा महाराज! महाराजांचा विजय असो!

उधोजीराजे : (खुशीत) हे घे, फर्जंदा! तुला बक्षीस!!

संजयाजी फर्जंद : (गाजर स्वीकारत) हे काय महाराज?

उधोजीराजे : (गाजर मोडून खात) खा रे, आंबे खा, कोयी कशाला मोजतोस, फर्जंदा?

संजयाजी फर्जंद : (गोंधळून) आंबे? पण ही तर गाजरं आहेत जी! की आजपासून गाजरांनाच आंबे म्हणायचा आदेश आहे?

उधोजीराजे : (भिवई वर चढवत) चतुर बोलतोस! ही खुशीची गाजरं आहेत…खा!

संजयाजी फर्जंद : (शंका येऊन) पण महाराज, चांगले आंब्याचे दिवस असताना, बारमाही मिळणारी गाजरं का खायची?

उधोजीराजे : (तात्त्विक मुद्दा उपस्थित) आंबे महाग असतात, आणि खुशीच्या वेळेला गाजरंच खायची आपल्याकडे पद्धत आहे!

संजयाजी फर्जंद : (चापलुसी करत) बरं, बरं! बाकी कालचं भाषण मात्र फर्मास बरं का, महाराज! निर्धार शिबिरात निस्ता आगडोंब उसळला होता उत्साहाचा!!

उधोजीराजे : (मानभावीपणाने) कल्पना आहे आम्हाला त्याची! त्या नादान कमळेच्या कंबरड्यात शब्दांच्या लाथा घालण्याची संधीच आम्ही शोधत होतो! काल अचानक गवसली! आता बसेल चीची करत!! हाहा!!

संजयाजी फर्जंद : (आणखी चापलुसी करत) तर हो! निस्ता जळफळाट चाललाय! कमळाबाईची बोलती बंद झाली आहे, आणि गद्दारांना तर तोंड कुठं लपवू असं झालंय!!

उधोजीराजे : (त्वेषानं गाजर मोडत) या उधोजीशी गाठ आहे म्हणावं! नाही यांना पुढल्या जुझात लोळवला तर नाव लावणार नाही!

संजयाजी फर्जंद : सकाळी मी जोरदार किल्ला लढवला महाराज! तुम्ही येईपर्यंत आम्ही दिवसभर शिबिर गाजवत ठेवलं!..

उधोजीराजे : ‘एआय’च्या माध्यमातून थोरल्या साहेबांचा आवाज घुमला तेव्हा तर अवघं शिबिर थरारुन गेलं होतं…

संजयाजी फर्जंद : (तोंडात बोट घालून) फिबिय…अभो आक…खर्रर्र…खक…डेब्ज…

उधोजीराजे : (संतापून) तोंडातलं बोट काढ पाहू आधी!! नॉन्सेन्स!!

संजयाजी फर्जंद : (बोट काढत ओशाळून) शिबिरच नाही तर आख्खा देश थरारुन गेला महाराज! गद्दारांच्या गोटात पळापळ झाली, कमळबाईची तर अश्शी काही तंतरली की यंव रे यंव! ही आहे एआयची कमाल!!

उधोजीराजे : एआय…ओय ओय ओय करत पळून गेले लेकाचे!!

संजयाजी फर्जंद : (निर्धारानं) पुढल्या जुझात आपली जीत गॅरंटीनं होणार! एआय तंत्रज्ञानामुळे आपल्या भात्यात आता अमोघ शस्त्र आलंय, महाराज!!

उधोजीराजे : (खिशातून कागद काढत) आपल्या पक्षातही त्या कमळाबाईप्रमाणे बूथप्रमुख, बूथ सरचिटणीस वगैरे नेमा! ते लोक इलेक्शन गंभीरपणानं घेतात, आपणही घेतलं पाहिजे!

संजयाजी फर्जंद : (चाचरत) त्यासाठी कार्यकर्ते कुठून आणायचे, महाराज? इथं रोज आऊट गोइंग सुरु आहे!

उधोजीराजे : (विचारात पडत) नुसतं तुमचं एआय तंत्रज्ञान इथं कामी येणार नाही! कमळेकडलं प्रत्येक तंत्रज्ञान उचला! बूथप्रमुख, पन्ना प्रमुख, प्रचार प्रमुख, घरोघर जाणारे कार्यकर्ते…याशिवाय यश पदरात पडणार नाही!

संजयाजी फर्जंद : इव्हीएम टेक्नॉलॉजीचं काय करायचं, महाराज?

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.