डॉ. बालाजी तांबे
जीवन आनंदमय व संतुलित होण्यासाठी कृती म्हणजे संस्कार. आयुर्वेद हा जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारा विषय असल्यामुळे त्यात असणाऱ्या आठपैकी एका विभागात अपत्यप्राप्ती व स्त्रीआरोग्य यावर लिहिलेले आहे. त्याच्याच जोडीला रसायन व वाजीकरण हे विभागही तयार केले, रसायन व वाजीकरण जर बरोबर नसेल तर स्त्रीआरोग्य, पुरुष आरोग्य व पर्यायाने अपत्य संस्कारित होणार नाही. आयुर्वेदात या अंगाने अनेक गोष्टी सांगितल्या. स्त्रीमुक्ती, स्त्रियांची कमी संख्या, स्त्रियांना होणारा जाच वगैरे विषयांचे सध्याच्या जगात फार चर्चा होत असल्याचे आपण पाहतो. दुर्बलांवर बंधने टाकणारे, त्यांच्यावर अत्याचार करणारे भ्याड लोक समाजात असतातच. या अत्याचारांचा बदला स्त्री शारीरिक पातळीवर लढून घेऊ शकत नसेल कदाचित, पण त्यांना निसर्ग मदत नक्कीच करतो व त्यातूनच सर्व मनुष्यमात्राच्या ऱ्हास सुरू होऊ शकतो. पुरुष व स्त्री एकमेकांवर अवलंबून असतात. त्या दोघांच्या एकरूपतेतूनच निसर्गचक्र चालू राहू शकते. दोघांनीही एकमेकांची मदत घेऊन जीवनाचा आनंद लुटत, जीवनात पुरुषार्थ दाखवत, वासना व दुसऱ्याच्या बंधनांपासून मुक्त होणे; हाच जीवनाचा उद्देश आहे.
समाजात दिवसेंदिवस लग्न न करण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे, स्त्रीला दिवस गेल्यावर स्त्री-पुरुष वेगळे व्हायचे प्रमाण वाढताना दिसत आहे. काळ-वेळ-वय-प्रकृती यांचे बंधन न पाळता केवळ शरीरसुखापुरतेच एकत्र येऊन केलेले हे सर्व पुर्वायुष्यातील प्रकार अपत्यप्राप्ती हवी असे ठरविल्यानंतर कुठले परिणाम दाखवतील आणि कशा प्रकृतीचे व प्रवृत्तीचे अपत्य जन्माला येईल, याचा नेम नसतो. त्यावर उत्तर शोधताना मती गुंग होते.
अशा वेळी संस्काराचे महत्त्व वादातीत ठरते. मुलांमध्ये काही दोष उत्पन्न झाले, तर आई वडिलांचे आयुष्य व मेहनत अशा मुलाला मोठे करण्यातच खर्ची पडते. त्याउलट जर आरोग्यवान, बुद्धिमान, संस्कारित मुले जन्माला आली तर सर्व काम सोपे होऊन समाजाला उपयोगी घटक तयार होतात. हे संस्कारशास्त्र तयार करताना आयुर्वेदाने जीवनाच्या सर्व अंगाना उपयोगी पडणाऱ्या शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक घटकांचा ऊहापोह केला गेला.
त्यामुळे गर्भ राहण्यापूर्वीची प्रकृती व तयारीवर विशेष भर दिला. एखादी लहानशी गोष्ट करतानाही काही तयारी करणे आवश्यक असते. लग्न करून स्त्री-पुरुषांनी एकत्र राहू लागणे ही काही गर्भधारणेची तयारी असू शकत नाही. कुठलीही तयारी न करता आलेल्या अनाहूत पाहुण्याला तोंड देताना तारांबळ उडण्याची परिस्थिती न येण्यासाठी ‘आपल्याला मूल हवे’ हे योजनापूर्वक ठरवून नंतरच नवागताला बोलवावे हा साधा व सरळ शिष्टाचार वाटत नाही का? त्यानंतर दिवस राहिल्यावर ज्या ज्या गोष्टींचा प्रभाव गर्भाच्या किंवा मातेच्या आरोग्यावर जन्मभर दिसणार त्या गोष्टींकडे लक्ष देऊन तसे संस्कार करून द्यायला नकोत का? दवाखान्यात आलेल्या बायकांना पाहिले असता बऱ्याच वेळा त्यांच्या त्रासाची सुरुवात बाळंतपणानंतर झालेली आढळून येते. याचा अर्थ बाळंपणानंतर योग्य काळजी न घेण्याने वात असंतुलित झाल्याने, हॉर्मोन्सचे असंतुलन झाल्याने स्त्रीच्या शरीरात नाना तऱ्हेच्या विकृती तयार झालेल्या आढळून येते, एवढेच नाही तर अपत्याच्याही शरीरात विकृती निर्माण झालेल्या दिसून येतात.
वास्तविक पाहता, पोटात नऊ महिने गर्भ सांभाळणे हा एक आनंदाचा व उत्सवाचा काळ आहे. घरात दहा दिवस गणपती बसविल्यास, नवरात्र बसविल्यास किंवा सात दिवसांचे एक सेमिनार (ज्ञानशिबिर) आयोजित केल्यास जसे नियमात राहावे लागते, तसेच गर्भारपणाच्या नऊ महिन्याच्या काळात काही पथ्य पाळावी लागतात.
तसेच गर्भधारणा झाल्यावर एका वेगळ्याच दिनचर्येचे पालन करायला नको का? काय खावे, काय खाऊ नये, डोहाळे कसे पुरवावे, कुठला योग करावा, कोठली आसने करावीत, स्त्री सतत आनंदात राहण्यासाठी काय करावे, तिने काय पाहावे, आपल्या शयनगृहात तिने कुठली चित्रे लावावीत, रोज कुणाला भेटावे, कुठल्या तरी भलत्याच प्रसंगाला सामोरे जाऊ नये अशी दिनचर्या संस्काराचाच एक भाग असते.
डोहाळजेवणाच्या वेळी स्त्रीला ओवाळण्याची पद्धत असते. आज जगातल्या सर्व ध्यानपद्धतींत, आध्यात्मिक आचारसंहितेत, ईश्र्वरी वास असलेल्या जागेत दिवा लावण्याची (मग ते निरांजन असो वा मेणबत्ती) पद्धत आहे. ओवाळताना दिव्यावर होत असलेल्या त्राटकाने शरीरातल्या शक्तीला कशी उत्तेजना मिळते, मन कसे प्रसन्न होते, मेंदूचे द्वार असलेल्या आज्ञा चक्रातून हा संदेश (सिग्नल) आत गेल्यावर मन कसे प्रसन्न होते हे वैज्ञानिकांनाही पटलेले आहे. तेव्हा ‘ओवाळणे’ ही एक भारतीय बुरसटलेली कल्पना आहे असे न मानता, अशा गोष्टींचा अवलंब करणे इष्ट नाही का?
पोटात मूल वाढत असताना कोणती औषधे घ्यावीत, जी उष्णता वाढविणार नाहीत, याची काळजी गर्भारपणात घ्यायला नको का? जन्मजात मुलाच्या अंगावरील त्वचेवर पुरळ (रॅश) असणार नाही, त्याच्या हृदय वगैरे अवयवात काही दोष असणार नाही याची काळजी गर्भारपणातच घेणे आवश्यक असते. गर्भारपणाच्या आधी पंचकर्म करून रसायन वाजीकरण चिकित्सा करून दांपत्याने तयारी केली असल्यासच पुढे चांगले परिणाम दिसतात. स्त्री संतुलनासाठी विशिष्ट संगीत ऐकल्याने सर्व शरीराचे संतुलन होऊन गर्भधारणा होण्यासाठी शारीरिक व मानसिक पातळ्यांवर सुपीक जमीन तयार होऊन गर्भ राहिल्यावर संगीताचा, मंत्रांचा, ओवाळण्याचा वगैरे संस्कार केले तर सुंदर निरोगी व सुदृढ अपत्यप्राप्ती होते असा अनेकांचा अनुभव आहे.
सध्या घरात फारशी कोणी वडीलधारी मंडळी नसतात. गर्भ राहिल्यावर काय करावे, मुलाला कसे वाढवावे, मसाज कसा करावा वगैरे गोष्टी नवदांपत्याला माहीत नसतात. पण याचे शिक्षण घेणे आवश्यक नाही का? नोकरी-धंदा करण्यासाठी व पैसा कमविण्यासाठी आपण सर्व तऱ्हेचे शिक्षण घेतो पण जीवनोपयोगी व कुटुंबास आवश्यक असणारे वंशवृद्धीचे हे शिक्षण घेणेही आवश्यक नाही का? आयुर्वेदीय गर्भसंस्कार हे यादृष्टीने महत्त्वाचे होत.
खरोखर जर काही उपयोग व्हायचा असला तर सर्वांचाच हातभार लागायला हवा. सध्या आपण आढळणाऱ्या विकृतींविषयी ओरडत राहतो. गावातल्या महादेवाच्या मंदिरात पाऊस पाडावा या नवसासाठी प्रत्येकाने एक छोटा गडवाभर दूध टाकण्याचे ठरविले. पण गावातील बहुतेक लोकांनी असा विचार केला की ‘मी एकट्याने पाणी टाकले तर इतरांनी टाकलेल्या दुधात समजून येणार नाही’, पण अशा प्रवृत्तीमुळे सकाळी सर्व गाभारा निव्वळ पाण्याने भरलेला दिसला. आज समाजात काहीसे असेच चित्र दिसते. प्रत्येक व्यक्ती ओरडते की आज जीवन बिघडलेले आहे, भ्रष्टाचार व हिंसाचार वाढला आहे पण असे होण्यामागे जबाबदारी सर्वांचीच आहे. समाज ज्या व्यक्तींमुळे बनतो त्या व्यक्ती सुदृढ व संस्कारसंपन्न निर्माण झाल्या तरच समाज चांगला होईल. प्रत्येकाने सहकार्य करायचे ठरवून बालक जन्मण्यापूर्वीच जर गर्भसंस्कार करून काळजी घेतली तर जीवनाचे नंदनवन होऊन पुन्हा सर्वांना आनंद, सौंदर्य व शांतीचा लाभ होईल.
(श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या लेखन, व्याख्यानांतून संतुलन आयुर्वेदद्वारा संकलित)