नवी दिल्ली : भगवद्गीता (Bhagavad Gita) आणि भरतमुनींच्या ‘नाट्यशास्त्र’ या ऐतिहासिक ग्रंथांच्या हस्तलिखितांना (UNESCO) मेमरी ऑफ दि वर्ल्ड रजिस्टर’मध्ये (Memory of the World Register) स्थान मिळाले आहे. यंदा या रजिस्टरमध्ये एकूण ७४ ऐतिहासिक दस्तावेजांचा समावेश करण्यात आला असून त्यात गीता आणि नाट्यशास्त्र या महाग्रंथांचाही समावेश आहे.
वैज्ञानिक महाक्रांती, महिलांचे इतिहासातील योगदान आणि अन्य ७२ देशांतील विविध क्षेत्रातील ऐतिहासिक सहकार्यासह चार आंतरराष्ट्रीय संघटनांचाही या रजिस्टरमध्ये समावेश करण्यात आला असल्याची माहिती ‘युनेस्को’कडून देण्यात आली आहे. ‘युनेस्को’च्या रजिस्टरमध्ये विविध प्रकारचे ग्रंथ, हस्तलिखिते, नकाशे, छायाचित्रे, विविध प्रकारच्या ध्वनिफिती आणि ध्वनिचित्रफिती यांचा समावेश आहे.
जगभर अठरा एप्रिल हा जागतिक वारसा दिन म्हणून साजरा करण्यात येतो त्याचे औचित्य साधून ही घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ‘एक्स’वर नोंदविलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटले आहे की जगभरातील भारतीयांच्या दृष्टीने हा अभिमानाचा क्षण आहे. हा समावेश म्हणजे आपल्या शाश्वत बुद्धिमत्तेला आणि समृध्द संस्कृतीला मिळालेली वैश्विक मान्यता आहे. गीता आणि नाट्यशास्त्राने पिढ्या न् पिढ्यापासून सभ्यता आणि चेतनेचे पोषण केले आहे. त्यांच्या अंतर्दृष्टीने जगाला प्रेरित केले आहे. दुसरीकडे सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी भारतीय सभ्यतेच्या वारशाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे.
भरतमुनींना लिहिलेल्या ‘नाट्यशास्त्र’ या महाग्रंथाचे पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्रामध्ये जतन करण्यात आले असून साधारणपणे इसवीसनपूर्व दुसऱ्या शतकामध्ये तो सूत्रबद्ध करण्यात आला होता. हा ग्रंथ नाट्यशास्त्रातील सर्वोच्च ज्ञानबिंदू मानला जातो त्यामध्ये साधारणपणे ३६ हजारांपेक्षाही अधिक श्लोकांचा समावेश असून त्याला गंधर्ववेद म्हणूनही ओळखले जाते. जागतिक साहित्यसृष्टीला हा ग्रंथ म्हणजे मोठी देण असल्याचे ‘युनेस्को’ने म्हटले आहे. युनेस्कोने ‘मेमरी ऑफ दि वर्ल्ड रजिस्टर’मध्ये ७४ नव्या डॉक्युमेंटरी हेरिटेज कलेक्शनचा समावेश केला असून त्यामुळे आतापर्यंत गोळा करण्यात आलेल्या विविध दस्तावेजांची संख्या ५७० वर पोचली आहे. ‘
अरबी योगदानाची दखलइजिप्तकडून देखील काही ऐतिहासिक दस्तावेज ‘युनेस्को’ला सादर करण्यात आले असून त्यात अरब जगताचे खगोलशास्त्र, ग्रहगोलांचे भ्रमण, तारकामंडळ यासंबंधीच्या संशोधनातील योगदान अधोरेखित करण्यात आले आहे. या रजिस्टरमध्ये चार्ल्स डार्विन (ब्रिटन), फ्रेडरिक नित्शे (जर्मनी), आणि विलहेल्म कॉनराड राँटजेन (जर्मनी) यांच्या अर्काइव्हचा समावेश आहे. त्यात विविध प्रकारच्या एक्स-रे छायाचित्रांचा समावेश आहे. ब्राझीलमधील शास्त्रज्ञ कार्लोस चगास यांचाही या अर्काइव्हमध्ये समावेश आहे.