लोणावळ्यात उद्यापासून वसंत व्याख्यानमाला
esakal April 19, 2025 09:45 PM

लोणावळा, ता. १९ : येथील वसंत व्याख्यानमाला समितीच्या वतीने सोमवारपासून वसंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष राधिका भोंडे व स्वरूपा देशपांडे यांनी दिली. २१ ते २७ एप्रिल दरम्यान सायंकाळी सहा ते साडेआठ या वेळेत भांगरवाडी येथील अॅड. बापूसाहेब भोंडे विद्यालयात नामवंत विचारवंतांच्या विचारांची मेजवानी लोणावळेकरांना अनुभवता येणार आहे.

प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या प्रेरणेने स्थापन झालेली वसंत व्याख्यानमाला २३ व्या वर्षात पदार्पण करत आहे. सोमवारी (ता. २१) अभिनेत्री मधुराणी गोखले-प्रभुलकर यांची प्रकट मुलाखत ‘मधुराणीचा जीवनपट’ याविषयावर होणार असून, अनघा मोडक या मुलाखत घेणार आहेत.
मंगळवारी (ता. २२) प्रा. मॅक्सवेल लोपेस, वसई यांचे ‘संत मीराबाई’, बुधवार (ता.२३) डॉ. नीतिन आरेकर यांचे ‘मला भेटलेली माणसे’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
गुरुवारी (ता. २४) मराठी अभिनेते स्वप्निल राजशेखर यांचे ‘टोटल फिल्मी आणि सामाजिक बांधीलकी’, शुक्रवारी (ता. २५) शरद कुलकर्णी, संभाजीराव गुरव, मेघा परमार आणि बाल गिर्यारोहक अन्वी घाटगे यांच्याबरोबर ‘हिमालयाची साद’ या विषयावर संवाद साधला जाणार आहे. शनिवारी (ता. २६) सुधांशु नाईक, आश्लेषा महाजन, आरती परांजपे, प्रसाद नातू यांचा ‘तेजस्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची स्फूर्तीगाथा’ या विषयावर कार्यक्रम होणार आहे. रविवारी (ता. २७) अनघा मोडक आणि ग्रुप यांच्या वतीने ‘गोष्ट एका राजहंसाची’ संगीतमय कार्यक्रमाने व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.