मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिला जाणारा यंदाचा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार नामवंत अभिनेते, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप दहा लाख रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक असे आहे. अभिनेते अनुपम खेर, अभिनेत्री मुक्ता बर्वे, अभिनेत्री काजोल देवगण आणि गझल गायक भीमराव पांचाळे यांनाही पुरस्कार जाहीर झाले आहेत.
चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार यंदा अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार असून, या पुरस्काराचे स्वरूप सहा लाख रुपये, स्मृतिचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक असे आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील मानाचा ‘राज कपूर जीवनगौरव’ पुरस्कार प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांना देण्यात येणार आहे, तर ‘राज कपूर विशेष योगदान पुरस्कार’ यंदा अष्टपैलू अभिनेत्री काजोल देवगण यांना देण्यात येईल . या दोन्ही पुरस्कारांची रक्कम अनुक्रमे १० लाख व सहा लाख रुपये आहे.
१९९३ पासून देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार या वर्षी मराठीतील ज्येष्ठ गझल गायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार दहा लाख रोख रक्कम, मानचिन्ह, मानपत्र व शाल अशा स्वरूपाचा आहे. सर्व पुरस्कारांचे वितरण २५ एप्रिल २०२५ रोजी मुंबईतील एनएससीआय डोम येथे एका भव्य समारंभात होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा आज सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांनी केली.
अशीही समितीगानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारार्थींची निवड करण्याकरिता शासनस्तरावर एका समितीचे गठन करण्यात आले होते. या समितीचे अध्यक्ष सांस्कृतिक कार्य मंत्री असून यामध्ये पाच अशासकीय सदस्य आहेत. पं. ब्रिजनारायण, अशोक पत्की. सत्यशील देशपांडे, पं उल्हास कशाळकर आणि अंबरीष मिश्र यांचा या समितीमध्ये समावेश होता. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव या समितीचे सदस्य असून सांस्कृतिक कार्य संचालक या समितीचे सदस्य सचिव आहेत.