पंजाब किंग्सला 12 एप्रिलला सनरायजर्स हैदराबादविरुद्ध 245 धावा करुनही पराभवाचा सामना करावा लागला. अभिषेक शर्मा याने केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने 9 बॉलआधी 246 धावांचं विजयी आव्हान सहज पूर्ण केलं. अभिषेक शर्मा आणि ट्रेव्हिस हेड हे दोघे सनरायजर्स हैदराबादच्या विजयाचे नायक ठरले. अभिषेक शर्मा याने 55 चेंडूत 10 षटकार आणि 14 चौकारांच्या मदतीने 141 धावांची खेळी केली. अभिषेक आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. अभिषेकने केएल राहुल याच्या 132 धावांचा विक्रम मोडीत काढला.
तसेच दुसऱ्या बाजूने अभिषेकला ट्रेव्हिस हेड याचीही चांगली साथ मिळाली. हेडने 37 बॉलमध्ये 9 फोर आणि 3 सिक्ससह 66 रन्स केल्या. अभिषेक आणि हेड या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 171 धावांची भागीदारी केली. यासह हैदराबादच्या विजयाचा मार्ग सोपा झाला. हैदराबादने 246 धावांचं आव्हान हे 18.3 ओव्हरमध्ये पूर्ण केलं.
तर त्याआधी पंजाबने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय केला. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने 36 बॉलमध्ये 6 सिक्स आणि 6 फोरसह 82 रन्स केल्या. पंजाबने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 245 धावांचा डोंगर उभा केला. मात्र यानंतरही हैदराबादने मिळवलेल्या विजयानंतर श्रेयस अय्यरने आश्चर्य व्यक्त केलं. श्रेयसने या पराभवानंतर काय म्हटलं? जाणून घेऊयात.
“हा एक शानदार स्कोअर होता. मात्र त्यांनी ज्या पद्धतीने 2 ओव्हर बाकी असताना विजयी आव्हान गाठलं, त्यामुळे मला हसू येतंय”, असं श्रेयसने म्हटलं. श्रेयसने पोस्ट मॅच प्रेझेंटेशनदरम्यान पंजाबच्या फिल्डिंगवर भाष्य केलं. पंजाब चांगली फिल्डिंग करु शकली असती. अभिषेक शर्मा याला चौथ्या ओव्हरमध्ये यश ठाकुर याच्या बॉलिंगवर जीवनदान मिळालं. अभिषेक कॅच आऊट झाला होता. मात्र नेमका तोच नो बॉल असल्याने अभिषेक वाचला.
“आम्ही त्या 2 कॅच घेऊ शकलो असतो. तो (अभिषेक) थोडा नशीबवान ठरला. त्याने एक चांगली खेळी केली. कॅच आपल्याला विजय मिळवून देतात आणि आम्ही तिथेच चुकलो. आम्ही चांगली बॉलिंग केली नाही. त्यामुळे यावर एकदा चर्चा करावी लागेल. त्यांनी केलेली ओपनिंग पार्टनरशीप शानदार होती”, असंही श्रेयसने म्हटलं.
सनरायजर्स हैदराबाद प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जीशान अन्सारी, मोहम्मद शमी आणि एशान मलिंगा.
पंजाब किंग्स प्लेइंग ईलेव्हन : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर), श्रेयस अय्यर (कर्णधार), मार्कस स्टॉइनिस, नेहल वढेरा, ग्लेन मॅक्सवेल, शशांक सिंग, मार्को जॅनसेन, अर्शदीप सिंग, लॉकी फर्ग्युसन आणि युझवेंद्र चहल.