शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी ओआरएस म्हणजेच ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन दिले जाते. जेव्हा एखाद्याला अतिसार, उलट्या किंवा जास्त घाम येणे यामुळे शरीर डिहायड्रेट होते तेव्हा डॉक्टर ओआरएस घेण्याची शिफारस करतात. त्यात ग्लुकोज आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात, जे शरीराला त्वरित ऊर्जा देतात आणि अशक्तपणा दूर करतात. तसेच उन्हाळ्यात डॉक्टर लोकांना ओआरएस सोबत ठेवण्याचा सल्ला देतात. पण मधुमेही रुग्ण ओआरएस पिऊ शकतात की नाही? याच प्रश्नाचे उत्तर आपण जाणुन घेऊयात…
मधुमेही रुग्णांना नेहमीच काळजी असते की ते गोड पदार्थांचे सेवन करू शकत नाही. साधारणपणे, बाजारात मिळणाऱ्या ओआरएसमध्ये ग्लुकोज मध्ये साखर असते, जी मधुमेहाच्या रुग्णांसाठी चांगली नसते. जर मधुमेही रुग्ण सामान्य ओआरएस प्यायला लागले तर त्याच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते, ज्यामुळे त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.
दिल्लीतील जीटीबी हॉस्पिटलमधील मेडिसिन विभागाचे डॉ. अजित कुमार यांनी सांगितले की जर मधुमेही रुग्णाला ओआरएसची आवश्यकता असेल तर त्याने सामान्य ओआरएस पिणे टाळावे. बाजारात “शुगर फ्री” किंवा “डायबिटिक फ्रेंडली” ओआरएस उपलब्ध आहेत जे ग्लुकोजशिवाय मिळतात. अशा ओआरएसद्वारे शरीराला आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स मिळतात पण रक्तातील साखर वाढत नाही. म्हणून, मधुमेही रुग्णांनी हे ओआरएस घ्यावे. मधुमेही रुग्णांनी बाजारात मिळणारे सामान्य ओआरएस घेऊ नये.
मधुमेहाच्या रुग्णांसाठी ओआरएसला घरगुती पर्याय
समजा मधुमेहींसाठी ओआरएस बाजारात उपलब्ध नसेल तर त्याचा पर्याय म्हणून तुम्ही घरी देखील ओआरएस तयार करू शकता. यासाठी तुम्ही एक ग्लास पाण्यात चिमूटभर मीठ आणि थोडे लिंबू मिक्स करून त्यांचे सेवन करू शकता. तसेच नारळ पाणी देखील एक चांगला पर्याय असू शकतो, कारण त्यात नैसर्गिक इलेक्ट्रोलाइट्स असतात आणि ते साखरमुक्त देखील असते.
मधुमेही रुग्णांनी काय करावे आणि काय करू नये?
मधुमेही रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय सामान्य ओआरएस घेऊ नये. जर तुम्हाला खूप अशक्तपणा आणि डिहायड्रेशन वाटत असेल तर प्रथम तुमच्या रक्तातील साखरेची पातळी तपासा आणि नंतर डॉक्टरांचा सल्ला घ्या. घरगुती ओआरएस किंवा डायबिटिक फ्रेंडली ओआरएस वापरणे हा सर्वात सुरक्षित मार्ग असू शकतो.
सामान्य ओआरएस मधुमेही रुग्णांसाठी योग्य नाही कारण त्यात साखर असते, परंतु गरज पडल्यास, साखरमुक्त ओआरएस किंवा घरी बनवलेले मीठ-लिंबू पाणी हा एक चांगला पर्याय असू शकतो.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)