Eknath Shinde Meets Raj Thackeray : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. राज्यातील सत्ताधारी महायुतीत अनेक कारणांमुळे धुसफूस चालू असल्याचा दावा केला जातोय. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या बंगल्यावर जाणार आहेत. गेल्या काही दिवसांपसून शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते उदय सामंत हे सातत्याने शिवतीर्थावर येऊन राज ठाकरे यांची भेट घेत होते. त्यानंतर आता खुद्द एकनाथ शिंदे हेच राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचणार आहेत.
राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या बंगल्यावर एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे हेदेखील शिवतीर्थ या बंगल्यावर पोहोचणार आहेत. त्यामुळे दोघेही पिता-पुत्र थेट राज ठाकरे यांच्या भेटीला पोहोचणार असल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. त्यांच्या या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यातच आहेत. मात्र या भेटीनंतर आता वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.
एकनाथ शिंदे यांचं शिवतीर्थावर जाणं म्हणजे डिनर डिप्लोमसी आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. याआधी उद्योगमंत्री उदय सामंत हे दोन वेळा राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थावर पोहोचले होते. त्यावेळी या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे थेट शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. त्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या भेटीमागचं कारण आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचे अनेक अर्थ लावले जात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना स्नेह भोजनाचं निमंत्रण दिलेलं आहे. हे स्नेह भोजन येत्या मनपा निवडणुकीत आणखी जास्त घट्ट होणार का ? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. दोन्ही नेते एकत्र भेटत असल्याने मनपा निवडणुकीत दोन्ही पक्षाची युती होऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महायुतीत धुसफूस चालू असल्याचा दावा केला जातो. आमच्या फाईल्स अर्थखात्याकडून अडवल्या जातात, अशी तक्रार अलीकडेच एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री अमित शाहांकडे केली असल्याचं बोललं जातंय. अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी दिली गेली नाही. अशा अनेक घडामोडी घडत असताना आता एकनाथ शिंदे हे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत.