मृतांच्या टाळूवरील ‘धान्य’ खाणाऱ्या पालघरमधील रेशनधारकांना चाप बसणार, अपात्र, दुबार, स्थलांतरित, मृत व्यक्तींची नावे कट करणार
Marathi April 16, 2025 12:45 PM

अनेक रेशनधारक अपात्र, दुबार तसेच स्थलांतरित असतानाही रेशनिंगच्या धान्यावर डल्ला मारतात. इतकेच नाही तर व्यक्ती मृत झाल्यावरही त्याचे नाव रेशनकार्डवरून कमी न करता धान्य घेतात. मात्र अशा रेशनधारकांना चाप बसणार आहे. सरकारच्या सूचनेनुसार पालघर जिल्ह्यातील तब्बल 7 लाख 42 हजार कुटुंबांचे रेशनकार्ड तपासली जाणार आहेत. यामध्ये अपात्र, दुबार, स्थलांतरित, मृत व्यक्तींच्या नावावर काट मारली जाणार आहे. रेशनकार्ड तपासणीची ही मोहीम जिल्हा पुरवठा शाखेकडून राबवली जात आहे.

पालघर, वसई, डहाणू, वाडा, विक्रमगड, तलासरी, जव्हार व मोखाडा या आठ तालुक्यांमधून अपात्र लाभार्थी रास्त धान्याचा लाभ घेत असल्याचे लक्षात घेत ही मोहीम आखण्यात आली आहे. रास्त धान्य दुकानातून विहित नमुन्यातील अर्ज दिल्यानंतर अर्ज भरून त्यासोबत रहिवास पुरावा म्हणून भाडे पावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, एलपीजी गॅस जोडणी क्रमांकाबाबत पावती, बँक पासबुक, विजचे देयक, टेलिफोन, मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र (कार्यालयीन इतर), मतदार ओळखपत्र, आधारकार्ड तसेच दिलेला वास्तव्याचा पुरावा हा एक वषपिक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा असे नमूद करण्यात आले आहे. तसेच उत्पन्नसंदर्भात उत्पन्नाचा दाखला देणे बंधनकारक असल्याचे पुरवठा विभागाने म्हटले आहे. कागदपत्रे सादर करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

शोधमोहिमेसाठी टीम तयार
फेब्रुवारी 2015 पासून राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार अन्नसुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय अन्न योजना (AAY) व प्राधान्य कुटुंब योजना (PHH) अशा दोन गटात लाभार्थ्यांचे विभाजन करण्यात आले आहे. शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये लाभार्थी संख्या उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही. त्यामुळे अपात्र, दुबार, स्थलांतरित, मृत लाभार्थ्यांना प्राधान्याने वगळण्याची कार्यवाही करण्यासाठी जिल्ह्यात 1 ते 30 एप्रिल या कालावधीत अपात्र शिधापत्रिकांची शोधमोहीम सुरू केली असून यासाठी खास टीम तयार करण्यात आल्या आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.