पुणे: स्पर्धा परीक्षेचे बेकायदा क्लास चालविणाऱ्यांवर आता पुणे पोलिसांची करडी नजर असणार आहे. बेकायदा वर्ग चालवल्यास कारवाई करण्याचा इशारा पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून देण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी मध्यरात्री अलका चौकात, फारसखाना पोलीस ठाण्याच्या आवारात विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन क्लास चालकांनाच भोवणार असल्याचं दिसून येत आहे. आंदोलन करण्यास काही स्पर्धा परीक्षा वर्गचालक विद्यार्थ्यांना प्रवृत्त करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या सगळ्या क्लास चालकाची बैठक घेतली आणि त्यांना कारवाईचा इशारा दिला आहे. महापालिका प्रशासनाची परवानगी, तसेच अन्य कायदेशीर बाबींची पूर्तता न करता क्लास सुरु असेल तर थेट पोलीस आयुक्त कारवाई करणार असल्याची माहिती आहे.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी पोलीस आयुक्तालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग चालकांची बैठक आयोजित करण्यात आली. परीक्षा पद्धती, अभ्यासक्रमातील बदलांसह विविध मागण्यांसाठी यापूर्वी विद्यार्थ्यांकडून आंदोलने करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी चार दिवसांपूर्वी फरासखाना पोलीस ठाण्याच्या आवारात आंदोलन केले. ते रात्री उशिरापर्यंत सुरू होते. ही आंदोलने करण्यास काही स्पर्धा परीक्षा वर्गचालक, तसेच अभ्यासिका चालक विद्यार्थ्यांना प्रवृत्त करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यावरून पोलिसांनी बैठक बोलवून इशारा दिला आहे.
पुण्यातील मध्यवर्ती भागात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना कोचिंग क्लास चालकांकडून धडे दिले जातात. प्रत्यक्षात मात्र, स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बहुतांश क्लास चालकांकडून चक्क विद्यार्थ्यांनाच आंदोलन करण्यासाठी पुढे केले जात आहे असल्याची पोलिसांची माहिती आहे. परीक्षा पुढे ढकला, एमपीएससी, यूपीएससी आयोगाच्या विविध धोरणात्मक निर्णयाबाबत टीका करण्यास भाग पाडले जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांकडून वारंवार आंदोलन करत नागरिकांसह पोलिसांना वेठीस धरले जात आहे. त्याबरोबरच स्पर्धा परीक्षेशी काही संबंध नसताना देखील काही जण आंदोलन भडकवत आहे. त्यामुळे आंदोलन भडकवणारेही यानिमित्ताने रडारवर आले आहेत.
पुण्यातील काही स्पर्धा परीक्षा क्लास चालकांकडून विविध नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून आले आहे. प्रामुख्याने स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची सुरक्षितता न घेणे, अग्निशमक दल, महापालिका, स्थानिक पोलिसांची परवानगी नसणे, यासह विविध परवानगीची तपासणी मोहीम आम्ही सुरू केली आहे. नियमबाह्य क्लासचालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
अधिक पाहा..