Prakash Bidwalkar Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सिंधुदुर्गात पुनरावृत्ती, आरोपीचा आका कोण? बड्या नेत्याचा गंभीर आरोप
Saam TV April 16, 2025 11:45 PM

सिंधुदुर्ग : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण ताजं असतानाच, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अगदी तसाच प्रकार समोर आला असल्याचं आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केले आहेत. या प्रकरणामध्येही संशयित मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट याचे राजकीय संबंध असल्याचं समोर येतंय. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदार संघाचे खासदार नारायण राणे, आमदार रवींद्र फाटक, आमदार निलेश राणे यांच्यासोबत आरोपी सिद्धेश शिरसाट याचे फोटो समोर आले आहेत. बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्ह्याची अवस्था भयानक आहे. २२ हजारासाठी सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर यांना नग्न करत अमानुष मारहाण करून त्यांची हत्या करणाऱ्या सिद्धेश शिरसाट याचा आका कोण? असा आरोप वैभव नाईक यांनी केला आहे.

कुडाळ तालुक्यातील चेंदवण नाईकवाडी येथील यांना ठार मारून सातार्डा येथील स्मशानभूमीत दहन केल्याची कबुली या प्रकरणातील संशयित आरोपींनी दिल्यामुळे या आरोपीविरुद्ध कट रचून हत्या करून पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार २०२३ साली घडून आला आहे. तब्बल दोन वर्षांनी पोलिसांनी या घटनेचा उलघडा केला आहे.

कुडाळ तालुक्यातील चेंदवण नाईक वाडी येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश अंकुश बिडवलकर याचे अपहरण केल्याप्रकरणी कुडाळ येथील सिद्धेश अशोक शिरसाट, माणगाव येथील गणेश कृष्णा नार्वेकर, सातार्डा येथील सर्वेश भास्कर केरकर आणि कुडाळ येथील अमोल श्रीरंग शिरसाट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना १३ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील चेंदवण गावातील नाईकनगर येथील सिद्धिविनायक उर्फ पक्या अंकुश बिडवलकर याचे दोन वर्षापूर्वी अपहरणानंतर मारहाण करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मार्च २०२३ मधील असून आता उघडकीस आली आहे. सिद्धिविनायक बिडवलकर याला चेंदवण गावातील नाईकनगर येथून अपहरण करून कुडाळमध्ये लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला. नंतर त्याचा मृतदेह सातार्डा-सावंतवाडी येथील स्मशानभूमीत नेऊन तिथे तो जाळून त्याची विल्हेवाट लावण्यात आल्याची पोलीस तपासात पुढे आली आहे.

नातेवाईकांमार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रकाशला मार्च २०२३ मध्ये पैशांच्या कारणावरुन सिद्धेश अशोक शिरसाट, अमोल श्रीरंग शिरसाट, गणेश कृष्णा नार्वेकर आणि सर्वेश भास्कर केरकर यांनी त्याला राहत्या घरातून जबरदस्तीने कारमधून घेऊन गेले होते. त्या दिवसापासून प्रकाश बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. हा सर्व प्रकार गंभीर स्वरुपाचा असल्याने बेपत्ता प्रकाशचा संशयितांनी घातपात केला असल्याचा संशय असल्याने पोलिसांनी त्या दृष्टीकोनातून आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवली. प्रकाश बिडवलकर याची नातेवाईक माधवी मधुकर चव्हाण हिच्या तक्रारीवरुन ९ एप्रिल २०२३ रोजी प्रकाश बिडवलकर याचं अपहरण झाल्याचा गुन्हा निवती पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास आता पूर्ण झाला आहे. या प्रकरणी शिंदे गटाचे सिद्धेश शिरसाटसह ३ संशयित आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.