पुणे : पुण्यातील नामांकित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये पैशांअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने गर्भवती महिलेचा प्रसूतीपूर्व मृत्यू झाल्याप्रकरणी जनसामान्यात मोठी संतापाची लाट उसळली आहे. या धर्मदाय रुग्णालयातील गरीब रुग्णांना उपचार व्यवस्थित दिले जातात की नाही, हे तपासण्यासाठी धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने रुग्णालयाला भेट देऊन हा अहवाल शासनाला सादर केला आहे.
याचदरम्यान, पुण्यातील आणखी एका रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आलाय. ससून रुग्णांच्या बाबतीत असलेली काळजी किती आहे? त्यांना कशाप्रकारे वागवलं जातं? याचंच जिवंत उदाहरण असलेला हा एक व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ पाहिल्यावर सर्वसामान्य माणसाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.
नेमकं काय घडलं?
पुण्यातील नामांकित ससून रुग्णालयातील हा धक्कादायक प्रकार आहे. येथे वार्डमधून रूग्णाला बाहेर आणण्यासाठी चक्क हॉस्पिटलकडे व्हिलचेअर नसल्याचं समोर आलंय. वार्डमधून उपचार करुन रुग्ण आपल्या पायांच्या टाचा घासत हॉस्पिटमधून बाहेर येत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. अपघातात एक पाय गमावल्यानं उपचार घेण्यासाठी हा रुग्ण आला होता. त्याच्यावर उपचार झाले. मात्र, येताना रुग्णाला सोडायला व्हीलचेअरच उपलब्ध नव्हती. ससून रुग्णालयातील धक्कादायक प्रकार पाहून या रुग्णालयात रुग्णाची किंमत नाही का? असाच सवाल आता उपस्थित होत आहे.
रुग्ण काय म्हणाला?
माझा पाय खराब होता, म्हणून मी हॉस्पिटलमध्ये आलेलो होतो. त्यांनी फक्त माझ्या पायाची ड्रेसिंग करुन दिली आणि मला हाकलून लावलं. मला त्यांनी व्हिलचेअरसुद्धा दिली नाही. मी घासत घासत गेलो आणि घासत घासत आलो. मी नागपूरहून इथे आलेलो आहे, माझं पु्ण्यात कुणी नाही. पण मी इथे आल्यानंतर यांनी मला हाकलून लावलंय.