Maharashtra Live Updates : हिंदू धर्माच्या संस्थेवर मुस्लिमांना संधी मिळणार का? SC चा केंद्राला सवाल
Sarkarnama April 17, 2025 12:45 AM
CM Devendra Fadnavis News : प्रत्येक शेतकऱ्याला 6 हजार देणार, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला 6 हजार देणार असल्याची मोठी घोषणा केलीय. तसेच विदर्भातील शेतकऱ्यांच्या जमीन संपादनाबाबत भाष्य करताना, शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या किंमतीच्या पाचपट मोबदला दिला जाईल असेही आश्वासन त्यांनी दिलं आहे.

Eknath Shinde : “पायलटची खुर्ची बदललीय”, एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपदावर भाष्य

अमरावती विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावर भाष्य केल्याने नवा चर्चांना रंग चढला आहे. यावेळी त्यांनी आमच्या आधीच्या सरकारच्या काळात अनेक प्रकल्प व योजना बंद होत्या. मात्र आम्ही (महायुती) सत्तेत आलो आणि अनेक योजनांचे टेकऑफ झालं. तेंव्हा पायलट मी होतो. त्यावेळी देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे माझे को-पायलट (सह-वैमानिक) होते. पण आता देवेंद्र फडणवीस आमचे पायलट असून मी आणि अजित पवार को-पायलट आहोत. केवळ आमची खुर्ची बदलली आहे. पण विकासाचं विमान तेच असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.

Waqf Amendment : हिंदू धर्माच्या संस्थेवर मुस्लिमांना संधी मिळणार का? SC चा केंद्राला सवाल

वक्फ (सुधारणा) कायद्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आज (ता.18) झाली. यावेळी न्यायालयाकडून केंद्राला नोटीस पाठविण्यात आली असून हिंदू धर्माच्या संस्थांवर मुस्लीम व्यक्तीची नेमणूक करणार का?, असा सवाल न्यायालयाने केला आहे.

Sanjay Shirsat : होय, आमचा पक्ष अमित शाहचं चालवतात! शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी थेट कबूलीच दिली

ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पण त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्यांनी होय, आमचा पक्ष अमित शाहचं चालवतात! असं म्हटंल आहे.

Swabhimani Shetkari Saghtana News : शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर अमरावतीत स्वाभिमानी आक्रमक

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती दौऱ्यावर असून यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली होती. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवण्यासाठी गाडीसमोर जाण्याचा प्रयत्न केला. तसेच जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Beed News : आष्टीतील धामणगावात येथे भाजपाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण

आष्टी तालुक्यातील धामणगाव येथे भाजपाच्या युवा मोर्चाच्या माजी पदाधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार धामणगाव यात्रेदरम्यान घडला असून अंभोरा पोलिसांकडून तपास करत आहेत.

Ambadas Danve News : शिवसेनेमध्ये सगळेच चांगले माणसं नको काही टुकार टाकार सुद्धा पाहिजे : अंबादास दानवे

संजय राऊत सकाळी बोलल्यावर कसं बोचतं? राऊत उद्धव ठाकरे पक्षाची भूमिका मांडतात. पण ते बोलून गेले की लगेच राणेचा पिल्लू बोलायला येत. राऊतांवर ते बोलतात कारण ते त्यांना बोचत. काश्मीरला मी गेलो होतो आमच्या गाडीचा ड्राइव्हर येत नव्हता मी विचारलं तू का येत नाही, तो म्हणाला तुम्ही शिवसेनेचे आहात. आम्ही येणार नाही. मी बोललो मे उद्धव ठाकरे के शिवसेना का आदमी हू, मग तो आला म्हणला उद्धव ठाकरे यांचा माणूस म्हणून मी आलो गद्दार शिवसेनेसाठी येत नाही.

manoj jarange News : मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत धडकणार

मराठ्यांचं भगवं वादळ मुंबईत धडकणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट मराठा आंदोलक मनोज जरांगे घेणार आहेत. ते 23 तारखेला मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. याबाबतची माहिती, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

Kumal Kamra Case : सत्तेचा दुरूपयोग सुरू

स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. गुन्हा दाखल करण्याआधी प्राथमिक चौकशीही केली नाही. बदनामी झालेल्यांनी तक्रार केली नाही. महाराष्ट्रात सत्तेचा दुरुपयोग सुरू आहे. २०२४ मध्ये ठाकरेही शिंदेंना गद्दार म्हणाले होते. त्यावेळी कारवाई झाली नाही. कुणाच्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणता येणार नाही, असे कुणाल कामराच्या वकीलांनी कोर्टात म्हटले आहे.

Devendra Fadnavis News : राणांकडून फडणवीसांचे स्वागत

अमरावती विमानतळ आणि प्रवासी विमानसेवेचे लोकार्पण केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नवाथे चौक, अमरावती येथे नागरिकांनी उत्स्फुर्त आणि जल्लोषात स्वागत केले. यावेळी आमदार रवि राणा, माजी खासदार नवनीत राणा आणि इतर मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदेंही उपस्थित होते.

Maharashtra Government News : फडणवीसांचे सरकार निष्पक्ष नाही

औरंगजेबाच्या कबरीवरून नागपूरमध्ये दंगल उसळली होती. यास कोण कारणीभूत आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निष्पक्ष सरकार चालवत नसल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथाला यांनी केला आहे. नागपुरातील काँग्रेसच्या सद्भावना यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Aditya Thackeray : आदित्य ठाकरे यांच्या हस्ते नाशिकमधील निर्धार शिबिराचे उद्घाटन

एकवेळ राजकारण सोडून घरी बसू. पण शिवसेना सोडणार नाही. जगेन तर शिवसेनेसोबत अन् मरू तर शिवसेनेसाठी, अशी भावना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अरविंद सावंत, चंद्रकांत खैरे, राजन विचारे आणि खासदार राजाभाऊ वाजे यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात पुन्हा सेनेचा भगवा फडकावण्याचा निर्धार चर्चा सत्रातून व्यक्त करण्यात आला. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते निर्धार शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी 'जय भवानी जय शिवाजी' असा जयघोष करण्यात आला.

Satish Bhosle : जामीन मिळावा यासाठी कोर्टात केला अर्ज

आरोपी सतीश भोसले विरोधामध्ये शिरूर पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत त्यापैकी वन विभागाचा एक गुन्हा दाखल आहे. वनविभागाच्या न्यायालय कस्टडीमध्ये असताना सतीश भोसलेने जामीन मिळावा यासाठी कोर्टात अर्ज केला आहे.

भाजपला कमळाबाई हे नाव बाळासाहेबांनीच ठेवले - संजय राऊत

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आज नाशिकमध्ये मेळावा होतो आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने भाजपला कमळाबाई म्हणून उल्लेख करणारा टीझर प्रसिद्ध करण्यात आला होता. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंनी भाजपला कमळाबाई हे नाव दिले होते. ते दूरदृष्टि होते हे दिसते.

एमपीएसची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

पुण्यात एमपीएससीच्या मुलांनी पुन्हा आंदोलन पुकारले आहे. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी आंदोलन सुरू आहे. एमपीएससीचे विद्यार्थ्यांचे राज्य सेवेच्या मुख्य परीक्षा ४५ दिवस पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

कुणाल कामरा प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, सरकारकडे मागितले उत्तर

कुणाल कामरा याने त्याच्या विरोधात दाखल झालेले गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाची सुनावणी आज होणार आहे. दरम्यान, या प्रकरणात सरकारने आपली बाजू मांडण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालनाने दिले आहेत.

Sanjay Raut : त्यांनी दर्गे तोडले त्यात आश्चर्य काय? राऊतांचा सवाल

ठाकरेंच्या शिवसेनेचे आज नाशिकमध्ये निर्धार शिबिर आहे. मात्र, दुसरीकडे नाशिकमध्ये अनधिकृत दर्ग्यावरील कारवाईमुळे सध्या नाशिकमध्ये तणावाचं वातावरण आहे. यावरूनच खासदार संजय राऊत यांनी हे सर्व शिबिरात अडथळे आणण्यासाठी सुरू असल्याचा आरोप केला आहे. शिवाय ज्यांना देशच तोडायचा आहे, त्यांनी दर्गे तोडले तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीही नाही, असं म्हणत त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

Sanjay Raut : शिवसेनेच्या शिबिरात अडथळे आणले - संजय राऊत

नाशिकमध्ये होत असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिबिरात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. ते म्हणाले आज दर्गांवर, मशिदींवर कारवाई होत आहे त्यामागचा उद्देश आमच्या शिबिरावरून लक्ष हटवणे हाच आहे.

Nashik Voilence News : नाशिकमध्ये अनधिकृत दर्गा हटवला, जमावाकडून पोलिसांवर दगडफेक

नाशिकमधील काठे अनधिकृत दर्गा काढण्याची कारवाई काल मध्यरात्री करण्यात आली. मुस्लिम धर्मगुरू आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. मात्र, याचवेळी दर्गा काढण्याला विरोध करत संतप्त जमावाने जमावाने पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुरू केली. यात अनेक पोलिस जखमी झाले आहेत. तर जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला.

Maharashtra Congress : काँग्रेसचा आज नागपुरात सद्भावना शांती मार्च

नागपूरमध्ये मागच्या महिन्यात झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात शांतता नांदावी यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आज नागपुरात सद्भावना शांती रॅली काढली जाणार आहे. या सद्भावना शांती रॅलीमध्ये प्रभारी रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव व सहप्रभारी कुणाल चौधरी यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.

Amravati Airport inauguration : अमरावती विमानतळाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार

अमरावती विमानतळाचे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत. या विमानतळावरून अलायन्स एअर कंपनीची मुंबई-अमरावती-मुंबई ही विमानसेवा आजपासून सुरू होणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.