हिंजवडी, ता. १६ : श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अपेक्षेप्रमाणे कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष तथा माजी खासदार विदुरा उर्फ नानासाहेब नवले यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली, तर अनपेक्षितपणे उपाध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक अनिल लोखंडे यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (ता.१६) दुपारी कारखान्याच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी कारखाना सभागृहात निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. निर्धारित वेळेत नवले व लोखंडे यांचेच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी पवार यांनी अर्जांची छाननी करत ते वैध ठरवून नवले आणि लोखंडे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा केली. तत्पूर्वी ५ एप्रिलला कारखाना संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया आली होती. तर, ६ एप्रिल रोजी निकाल झाला होता. १८ संचालक बिनविरोध निवडण्यात आले होते.
यानंतर प्रास्ताविकपर भाषणात संचालक चेतन भुजबळ यांनी निवडणुकीसाठी योगदान देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार व सर्व आमदारांचे आभार मानले. अध्यक्ष नानासाहेब नवले उपाध्यक्ष आणि लोखंडे निरीक्षक सुरेश घुले व निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांचा सन्मान झाला.
विद्यमान उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, माउली दाभाडे, चेतन भुजबळ, दत्तात्रय जाधव, धैर्यशील ढमाले, यशवंत गायकवाड, दत्तात्रय उभे, संदीप काशिद, छबुराव कडू, भरत लिम्हण, उमेश बोडके, विलास कातोरे, अतुल काळजे, धोंडीबा भोंडवे, लक्ष्मण भालेराव, राजेंद्र कुदळे, शिवाजी कोळेकर, संचालिका ज्योती अरगडे, शोभा वाघोले आदी नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.
कारखाना एक कुटुंबच
अध्यक्ष नानासाहेब नवले व उपाध्यक्ष अनिल लोखंडे यांनी निवडीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संचालक मंडळ व सभासदांचे आभार मानले. कारखाना एक कुटूंब असून त्याप्रमाणे सर्वांना विश्वासात व सोबत घेऊन कारखान्याच्या व शेतकरी हिताचे निर्णय घेऊन सर्वांचे प्रगती साधण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
सर्व तालुक्यांना समसमान संधी
सलग दहा वर्षे मावळ तालुक्याला उपाध्यक्षपदी संधी मिळाली. यानंतर कारखान्याच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्मिती व्हावी, म्हणून खेड तालुक्याला उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती आहे. तसेच कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व तालुक्यांना समसमान संधी मिळावी, म्हणून सव्वा वर्षांनी उपाध्यक्षपदाची भाकरी फिरवण्यात येणार असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली.
WKD25A08504