Sanjay Raut : बाळासाहेबांच्या AI भाषणावर टीका करणाऱ्यांना संजय राऊत यांचं परखड उत्तर
GH News April 17, 2025 03:17 PM

“बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ज्यांनी बनावट शिवसेना निर्माण केलीय, त्यांनी हे बोलू नये. बाळासाहेबांच्या नावाचा बनावट वापर करून एक शिवसेना अमित शाह यांनी तयार केली. ती इथे महाराष्ट्रात काही लोकांना चालवायला दिली. बनावट शिवसेना. त्यांना बाळासाहेबांच्या भूमिका बनावट वाटणारच. हे काय कालच झालं का? या आधी मुंबईच्या शिबीरातही असा प्रयोग केला. तेव्हा लक्ष गेलं नाही. तंत्रज्ञान आणि विज्ञान पुढे गेले आहेत. मोदींनी एआय द्वारे देश कसा पुढे नेतोय याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी आपल्या नेत्यांचं ऐकलं पाहिजे” असं खासदार संजय राऊत विरोधकांवर टीका करताना म्हणाले. काल नाशिकमध्ये उद्धव ठाकरे गटाचा निर्धार मेळावा संपन्न झाला. यावेळी स्वर्गीय हिंदूह्द्यसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं AI तंत्रज्ञानाचा वापर करुन भाषण दाखवण्यात आलं. त्यावर विरोधकांनी केलेल्या टीकेला आज संजय राऊत यांनी उत्तर दिलं.

“बाळासाहेबांशी या लोकांचा काय संबंध आहे? संबंध काय? अमित शाह यांनी एक बनावट संघटना केली आणि त्याला शिवसेना हे नाव निवडणूक आयोगाला द्यायला लावलं. म्हणून त्यांचा बाळासाहेब ठाकरेंवर अधिकार होत नाही” असं संजय राऊत म्हणाले.

‘तुम्ही धर्मवीराचं आम्हाला शिकवू नका’

“त्यांनी एक सिनेमा काढला, काय तो. धर्मवीर. दोन भाग काढले. वेब सीरिज आहे. पाच पंचवीस भाग काढत राहतील. तो सिनेमा मी काही पाहिलं नाही. या लोकांपेक्षा आनंद दिघेंना आम्ही जास्त ओळखतो. त्यांच्या नावाने बनावट भूमिका, बनावट विचार आणि बनावट संवाद हे निर्माण केलेलं चाललं का. तुम्ही धर्मवीराचं आम्हाला शिकवू नका. तुमच्यापेक्षा जास्त आम्ही त्यांच्या जवळ राहिलो आहोत. एकमेकांच्या फार जवळ होतो. आमचे राजन विचारे सर्वात जास्त त्यांच्या जवळ होते” असा दावा संजय राऊत यांनी केला.

‘तुमचा विषय काय, संबंध काय?’

“तुम्ही आनंद दिघेंना ज्या बनावट पद्धतीने पडद्यावर आणलं त्यावर बोला तुम्ही. त्याच्या संदर्भात बोलला तर त्यावर वाद करू. पण बाळसाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे वडील आहेत. शिवसेनेचे निर्माते आहेत. आम्ही अमित शाहांवर केलं असतं तर तुम्ही आमच्या पक्षप्रमुखांवर असं काय करता असं म्हटलं असतं तर तुमची तक्रार योग्य आहे. पण आम्ही शिवसेनाप्रमुखांवर केलं, तर तुमचा विषय काय, संबंध काय?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.