बेळगाव : बेळगाव शहरात सुरू असलेल्या ड्रेनेज पाईपलाईनच्या (Drainage Pipeline) कामादरम्यान भीषण दुर्घटना काल (ता. १६) दुपारी घडली. गांधीनगरजवळील राष्ट्रीय महामार्गालगत मातीचा ढिगारा कोसळून दोन मजुरांचा मृत्यू झाला. शिवलिंग मारुती सरवे (वय २०) आणि बसवराज सरवे (वय ३८, दोघे रा. पटगुंदी, ता. मुडलगी) अशी मृतांची नावे आहेत.
दरम्यान, प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईचे आदेश अधिकाऱ्यांना बजावल्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) यांनी कळविले आहे. पोलिसांनी सांगितले की, महानगरपालिकेतर्फे शहरात ड्रेनेज पाईपलाईन घालण्याचे काम सुरू आहे. याच कामासाठी मुडलगी तालुक्यातील पटगुंदी या गावामधील शिवलिंग आणि बसवराज हे दोघे मजूर आले होते.
काल दुपारी साडेबारा ते दोनच्या दरम्यान काम सुरू असताना अचानक मातीचा मोठा ढिगारा कोसळला आणि दोघे त्यात अडकले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिक नागरिकांनी तत्काळ जेसीबीच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. जवळपास एक तास अथक प्रयत्न केल्यानंतर दोघांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने बेळगावात जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुर्दैवी घटनेनंतर घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करत गर्दी हटवली. दरम्यान, मृत मजुरांचे कुटुंबीय रुग्णालयात पोचताच त्यांनी आक्रोश केला. या दुर्घटनेमुळे कामाच्या ठिकाणी सुरक्षेचा अभाव आणि हलगर्जीपणाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
घटनेनंतर माळमारुती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मजुरांच्या सहकाऱ्यांकडून फिर्याद दाखल करून घेतली आहे. पुणे येथील घारपुरे प्रा. लिमिटेड कंपनी (Gharpure Pvt. Ltd. Company) विरोधात गुन्हा नोंदविला आहे, अशी माहिती माळमारुती पोलिस ठाण्याचे (Malmaruti Police Station) पोलिस उपनिरीक्षकांनी सांगितले.