Parbhani News : 'थॅलेसेमिया'मुक्तीला आता शासनाचे बळ; राज्यभरात उपाययोजना राबविणार, मेघना बोर्डीकरांचा पुढाकार
esakal April 17, 2025 02:45 PM

परभणी : राज्यातील थॅलेसेमियाग्रस्त बालकांसाठी उपचारांची आवश्यकता आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी आधार निर्माण करण्याचे काम येथील ‘थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुप’कडून सातत्याने करण्यात येत आहे.

मात्र, पुरेसा राजाश्रय व मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने या कार्यात काही अडथळे निर्माण होत होते. आता आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी याप्रकरणी लक्ष घातले असून, राज्यस्तरावरून ठोस पद्धतीने उपाययोजना केल्या जाणार आहेत.

थॅलेसेमियासारख्या गंभीर आनुवंशिक आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य शासनाने आता अधिक ठोस पावले उचलण्यास सुरवात केली आहे. या अनुषंगाने मंगळवारी (ता. १५) मुंबईतील निर्मल भवन येथे थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्र मोहिमेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. यात आजारावर प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले. बैठकीत थॅलेसेमिया आजारावर वेळेवर निदान, जनजागृती, तपासण्या व समुपदेशन आदींचा समावेश असलेल्या व्यापक मोहिमेचे स्वरूप स्पष्ट करण्यात आले.

ग्रामपंचायत स्तरापासून ते शहरी भागापर्यंत विविध माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. खासगी रुग्णालये व दवाखान्यांमध्ये काही विशिष्ट तपासण्या अनिवार्य केल्या जाणार असून, यामुळे पुढील पिढीत आजाराचा प्रसार रोखण्यास मदत होणार आहे. आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना विशेष कार्यशाळांद्वारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यात निदान, उपचार व्यवस्थापन आणि समुपदेशनाचा समावेश असेल. थॅलेसेमियाग्रस्त रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांसाठी मानसिक आधार म्हणून समुपदेशन सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

पिंपळगावकरांकडून सादरीकरण

या बैठकीत येथील थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुपचे लक्ष्मीकांत पिंपळगावकर यांनी थॅलेसेमिया आजारावर सविस्तर माहितीचे सादरीकरण केले. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे आयुक्त अमगोथू श्रीरंग नायक, तसेच मंत्रालयातील विविध वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राला थॅलेसेमियामुक्त करण्याच्या दिशेने राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून, येत्या काळात याचे सकारात्मक परिणाम दिसून येतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

७२ बालकांवर ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट’ शस्त्रक्रिया

राज्यासह इतर राज्यांतील ७२ बालकांवर ‘बोनमॅरो ट्रान्सप्लांट’ ही किचकट व महागडी शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. वेल्लोर, मुंबई, पुणे व बंगळुरू येथे या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. यात परभणी जिल्ह्यातील १४ बालकांवर बोनमॅरो ट्रान्सप्लांटची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. संबंधित मुले आता थॅलेसेमियामुक्त आयुष्य जगत आहेत. दरम्यान, आणखी ३८ बालकांवर बोनमॅरो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया या वर्षात होणार आहेत.

‘थॅलेसेमियामुक्त जिल्हा परभणी’ या अभिनव अभियानाची सुरवात ७ एप्रिल २०२२ ला झाली होती. थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुप परभणी व जिल्हा प्रशासनाच्या या अभियानाची राज्यपातळीवर दखल घेतल्या गेली आहे. आता व्हिजन २०३० थॅलेसेमियामुक्त महाराष्ट्र हे महत्त्वाकांक्षी अभियान राबविण्यात येणार आहे.

- लक्ष्मीकांत पिंपळगावर, थॅलेसेमिया सपोर्ट ग्रुप, परभणी

थॅलेसेमिया आजारासंदर्भात राज्य सरकार गंभीर आहे. वेळेवर निदान, जनजागृती, तपासण्या व समुपदेशन यांचा समावेश असलेली रणनीती तयार केली जात आहे. ग्रामपंचायत स्तरापासून शहरी भागांपर्यंत जनजागृती केली जाईल. वेळेवर तपासण्या करून घेतल्या जातील. खासगी रुग्णालये व दवाखान्यांमध्ये विशिष्ट तपासण्या अनिवार्य केल्या जातील.

- मेघना बोर्डीकर, आरोग्य राज्यमंत्री

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.