Solapur : झोपडपट्ट्यांचा होणार पुनर्विकास: पहिल्या टप्प्यात चारचा समावेश; आमदार देशमुख, आयुक्त ओम्बासेंकडून पाहणी
esakal April 17, 2025 02:45 PM

सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरातील झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास केला जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात कुर्बान हुसेन, तालुका ऑफिस, मोदी हरिजन आणि बाबू जगजीवनराम या चार झोपडपट्ट्यांचा प्राधान्याने विकास केला जाणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरात सुरू असलेल्या गृह प्रकल्पांच्या भौतिक सुविधांची पाहणी तसेच शहरातील झोपडपट्टीतील मूलभूत सुविधांची पाहणी आमदार विजयकुमार देशमुख, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे व इतर अधिकाऱ्यांनी आज केली.

शहरात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत विविध घटकांसाठी सुरू असलेल्या राष्ट्रतेज अटल गृह निर्माण प्रकल्प, सहस्त्रार्जुन गृहनिर्माण प्रकल्प, गोदूताई परुळेकर गृहनिर्माण प्रकल्प, रे नगर गृहनिर्माण प्रकल्पातील रस्ते, ड्रेनेज, पाणी पुरवठा आदी मूलभूत सुविधांची पाहणी व नावीन्यपूर्ण बांधकाम पद्धतीची माहिती आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी प्रत्यक्ष जाऊन घेतली. यावेळी राष्ट्रतेज अटल गृहनिर्माण प्रकल्पात आयुक्तांच्या हस्ते वृक्षारोपण करून हरितक्षेत्र विकास कामाची सुरुवात करण्यात आली.

त्याच बरोबर झोपडपट्ट्यांमधील नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्याबरोबर त्यांचे जीवनमान उंचाविण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेतून पक्की घरे उभारणीचे नियोजन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर २५६ गाळे परिसरातील जुन्या घरांचे पाडकाम करून कमी किमतीमध्ये नवीन घरे उभारण्याच्या प्रस्तावावर प्रशासनाला त्वरित निर्णय घेता यावा, याबाबत आमदार विजयकुमार देशमुख यांनी या भेटीप्रसंगी आयुक्तांंना सूचना दिल्या. यावेळी कुर्बान हुसेन झोपडपट्टी, तालुका ऑफिस झोपडपट्टी, मोदी हरिजन व जगजीवनराम झोपडपट्टीत भेट देऊन तेथील परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता सारिका आकुलवार, सहायक अभियंता प्रकाश दिवाणजी, शहर तांत्रिक कक्षाचे नागनाथ पद्मगोंडे, सिद्धराम मेंदुडले, प्रशांत गुंड, गोकूळ चितारी, अभिषेक टोणपे, संतोष ऐदाळे, मेहूल मुळे, अमोल काटकर हे उपस्थित होते.

चावडी वाचन अन् नकाशांचे होणार सादरीकरण

१९ एप्रिल रोजी शहरातील कुर्बान हुसेन झोपडपट्टी, २१ एप्रिल रोजी तालुका ऑफिस झोपडपट्टी, २३ एप्रिल रोजी मोदी हरिजन, २५ एप्रिल रोजी जगजीवनराम झोपडपट्टी परिसरातील नागरिकांची बैठक घेण्यात येणार आहे. यावेळी चावडी वाचन व प्रस्तावित घरांचा नकाशा समजावून सांगण्यात येणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

२५६ गाळा परिसराची पाहणी

आमदार देशमुख आणि आयुक्त ओम्बासे यांनी २५६ गाळा परिसराची पाहणी केली. यावेळी येथील जीर्ण झालेली घरे पाडून आवास योजनेंतर्गत नवी घरे लवकरात लवकर उभारण्याच्या सूचना आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिल्या.

झोपडपट्ट्यांचा सर्वांगिण विकास साधायचा असेल तर मूलभूत सुविधा देणे आवश्यक आहे. परंतु, प्रत्यक्षात परिस्थिती पाहता अनेक अडचणी आहेत. त्यामुळे आवास योजनेंतर्गत येथील नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे आवास योजनेतून प्रायोगिक तत्त्वावर चार झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास करण्याचा प्रयत्न आहे.

- डॉ. सचिन ओम्बासे, आयुक्त, महापालिका

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.