नांदेड : मानवी शरीराला अन्न आणि पाण्याची मूलभूत गरज असते. मात्र, ठरावीक क्षमतेपेक्षा शरीरात कमी पाणी असेल, तर त्याचे वाईट परिणाम शरीरावर होतात. शरीरात ६० ते ७० टक्के पाणी आवश्यक असते. डिहायड्रेशन रोखण्यासाठी दररोज भरपूर पाणी पिणे अत्यावश्यक आहे. पण, पाणी पिण्याचे प्रमाण प्रत्येकाच्या गरजेनुसार असते, असेही तज्ज्ञ सांगतात.
शरीराची उष्णता बाहेर टाकण्यासाठी, पोषक द्रव्य व ऑक्सिजन शरीराच्या पेशींपर्यंत पोचविणे आणि मलाद्वारे शरीरातून कचरा विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आवश्यक आहे. सांधे आणि डोळे यांसारख्या संयुक्त मज्जासंस्थेचे योग्य कार्य करण्यासाठी पाणी आवश्यक असते.
कोणत्या व्यक्तीने किती पाणी प्यावे, यासंदर्भात वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या टिप्स दिल्या जातात. वातावरण, तापमान, आहार, स्तनपान करणारी महिला, गर्भवती यांनी किती पाणी प्यावे, यासंदर्भातही आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. उन्हाच्या दिवसांत गरम वातावरण असले, पाणी तरी सामान्यतः दोन लिटर पाणी पिणे आवश्यक असते. पाण्याचा शरीरावर चांगला; तसेच विपरीतही परिणाम होतो.
दिवसभरात किमान चार-पाच लिटरपर्यंत प्यावे पाणीउन्हाळ्याच्या दिवसांत गरम वातावरण असते. त्यामुळे या दिवसांमध्ये शरीराला अधिक पाण्याची गरज असते. तसेच काहींना वारंवार तहान लागते. परंतु, पाण्याचे अतिप्रमाणही धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे दिवसभरातून किमान चार ते पाच लिटरपर्यंत प्यावे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे; तसेच या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणीदार फळे खाणेही योग्य असते. यामध्ये काकडी, टरबूज, नारळपाणी, स्ट्रॉबेरी ही फळे खावीत. त्याचबरोबर उन्हाळ्यात लिंबू-पाणी घेण्याचाही सल्ला अनेकवेळा तज्ज्ञांकडून दिला जातो.
शरीराच्या आवश्यकतेनुसार पाणी प्यावेवैद्यकशास्त्रानुसार, प्रत्येकाच्या शरीरानुसार पाण्याची गरज वेगळी असते. शरीराच्या आवश्यकतेनुसार पाणी पिणे गरजेचे असते. शरीरात पाण्याची पातळी योग्य ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. जास्त पाणी पिण्यामुळे जसे धोके आहेत; तसेच धोके कमी पाणी पिण्यानेसुद्धा उद्भवत असतात. त्यामुळे नागरिकांनी शरीराची आवश्यक गरज असलेला पाणी दररोज चार ते पाच लिटरपर्यंत प्यावे, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.
मानवी शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास आजार उद्भवू शकतात, बद्धकोष्ठता, कोरडी त्वचा, सांधेदुखी, अपचन, कमी रक्तदाबाचा धोका, किडनीचा त्रास अशा समस्या निर्माण होऊ शकतात. शरीराच्या आवश्यकतेनुसार पाणी प्यावे. पाणी अधिक पिल्याने शरीराला फायदाच होतो. तासाला एक ग्लास, दिवसभरात चार ते पाच लिटर पाणी शरीराला पाहिजे.
— डॉ. संदिप भारूडे
शरीर हायड्रेट असणे, म्हणजे त्याला पाण्याचा योग्य पुरवठा करणे होय. पाण्याव्यतिरिक्त काकडी, कोथिंबीर, टरबूज, स्ट्रॉबेरी, नारळपाणी, डाळिंब, काळा मनुका या फळांचा उपयोग करता येतो. टोमॅटोसारखी फळे, भाज्या खाव्यात. फळांमध्ये पाण्याचे प्रमाण अधिक असून, जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरही पर्याप्त असते.
— डॉ. प्रेमेंद्र बोथरा,
आहार तज्ज्ञ
गरजेपेक्षा कमी पाणी असले, तर किडनीमध्ये स्टोन होतात. वैद्यकशास्त्रानुसार, प्रत्येकाच्या पाण्याची गरज वेगवेगळी असते. दररोज पाच ते सहा लिटर पाणी पिण्यास सांगणे हेही चुकीचे आहे. यामुळे अनेक आजार बळावण्याची शक्यता आहे.
— डॉ. कैलास शेळके,
जिल्हा आरोग्य अधिकारी.