कोल्हापूर : मित्रांसोबत पोहण्यास गेलेल्या शिव नवीन पटेल (वय १४, रा. टिंबर मार्केट) याचा रंकाळा (Rankala) शेजारील पतौडी खणीत बुडून मृत्यू झाला. काल दुपारी दीडच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. त्याच्या मित्रांनी घरी जाऊन तो बुडाल्याची माहिती दिली. (Fire Brigade) जवानांनी दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला.
शिव पटेल हा साने गुरुजी वसाहत (Sane Guruji Colony) परिसरातील शाळेत इयत्ता नववीत शिकत होता. परीक्षेचा शेवटचा पेपर आटोपून तो मित्रांसोबत पोहण्यासाठी पतौडी खाणीवर गेला होता. दुपारी दीडच्या सुमारास पोहताना तो अचानक बुडाला.
हे त्याच्या काही मित्रांनी पाहिले. एकाने सायकलवरून येऊन शिवच्या घरच्यांना ही माहिती दिली. शिवचे वडील खणीवर आल्यानंतर त्यांनी भयभीत अवस्थेत पोलिसांना व अग्निशमन दलाला याची माहिती दिली.
सीपीआरमध्ये नातेवाईकांची गर्दी...शिवचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये आणण्यात आला. हवालदार ऋषिकेश ठाणेकर, सागर मोरे, वैभव अतिग्रे, उदय काटकर यांनी मृतदेहाचा पंचनामा पूर्ण केला. यावेळी सीपीआर शवागाराबाहेर पटेल यांच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. मनमिळावू व अभ्यासात हुशार शिवच्या दुर्दैवी मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला. त्याच्या मागे आई, वडील, बहीण असा परिवार आहे.
दोन तासांची शोधमोहीम...अग्निशमन दलाने तो खणीत उतरलेल्या पायरीपासून बऱ्याच अंतरापर्यंत त्याचा शोध घेतला. घटनेची माहिती मिळताच तेथे बघ्यांची गर्दीही वाढत गेली. वेळ जाईल तसतशी शिवच्या वाचण्याची शक्यता मावळत गेली. दोन तासांच्या प्रयत्नानंतर शिवचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांच्या हाती लागला.