‘गोकुळ’चा 136 कोटींचा उच्चांकी अंतिम दूधदर फरक, दूध उत्पादकांना गतवर्षीपेक्षा 22 कोटी जादा मिळणार; अरुण डोंगळे यांची माहिती
Marathi April 17, 2025 05:25 PM

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (गोकुळ) १३६ कोटी ०३ लाख रुपये उच्चांकी अंतिम दूधदर फरक दूध संस्थेच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. गतवर्षी देण्यात आलेल्या दूधदर फरकाच्या रकमेपेक्षा २२ कोटी ३७ लाख इतकी जास्त असल्याची माहिती चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली.

गोकुळ दूध संघ कोल्हापूरच्या ग्रामीण भागाची अर्थवाहिनी आहे. दर दहा दिवसाला न चुकता मिळणाऱ्या दूध बिलामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था प्रवाहित राहते. दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दूध परतावा देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात. विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, गतिमान प्रशासन, काटकसरीचा कारभार, दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत झालेली वाढ तसेच वाशी दुग्ध शाळेचेविस्तारीकरण, नुकताच कार्यान्वित झालेला करमाळा येथील सौरऊर्जा प्रकल्प अशा धोरणात्मक निर्णयांमुळे संघाच्या व्यापारी नफ्यात यावर्षी चांगली वाढ झाली.

दूध उत्पादकांना यावर्षी दिवाळीला अंतिम दूधदर फरक, हीरक महोत्सवी दरफरक २० पैसे प्रतिलिटर, दूध फरकावरील व्याज, डिव्हिडंड असे एकूण १३६ कोटी ०३ लाखांची रक्कम दूध संस्थेच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. ही रक्कम गतवर्षी देण्यात आलेल्या दूधदर फरकाच्या रकमेपेक्षा २२ कोटी ३७लाख इतकी जास्त आहे. तसेच १ फेब्रुवारी २०२५ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत दूध उत्पादकांना पशुखाद्यासोबत फर्टिमिन प्लस मिनरल मिक्स्चरच्या ४ लाख ७३ हजार ५४२ इतक्या बॅग्ज मोफत देण्यात आल्या असून, त्याची किंमत ७ कोटी १० लाख ३१ हजार ३०० इतकी होते. याचबरोबर कर्मचाऱ्यांनाही दोन टक्के जादा बोनस देण्यात येणार आहे, अशी माहिती ‘गोकुळ’चे चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली.

दूध उत्पादनवाढीसाठी विविध योजना आणि उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्व. आनंदराव पाटील चुयेकर म्हैस दूधवाढ व गुणवत्ता सुधार कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी, यामुळे गेल्या दोन वर्षांत म्हैस दूध संकलनात चांगली वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२०२५ मध्ये १ एप्रिल २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत ‘गोकुळ’ला पुरवठा केलेल्या म्हैस दुधास सरासरी प्रतिलिटर २ रुपये ४५ पैसे व गाय दुधास सरासरी प्रतिलिटर १ रुपये ४५ पैसे याप्रमाणे दूध उत्पादकांना अंतिम दूधदर फरक देण्यात येणार आहे.

गतसालापेक्षा यावर्षी दूध उत्पादकांना प्रतिलिटर २० पैसे जादा दूध दरफरक मिळणार आहे. यामुळे सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये दूधपुरवठा करणाऱ्या म्हैस दूध उत्पादकास सरासरी प्रतिलिटर (दरफरकासह) ६० रुपये ४८ पैसे, तर गाय दूध उत्पादकास सरासरी प्रतिलिटर (दरफरकासह) ३६ रुपये ८४ पैसे इतका उच्चांकी दूधदर अंतिम दरफरकासह मिळणार आहे. ‘गोकुळ’ने दूध संकलनाचा १८ लाख ५८ हजार लिटरचा टप्पा ओलांडला आहे, अशी माहितीही चेअरमन अरुण डोंगळे यांनी दिली.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.