आयपीएल स्पर्धेची रंगत प्रत्येक सामन्यानंतर वाढताना दिसत आहे. एकूण दहा संघ असून आता प्लेऑफसाठी चुरस निर्माण झाली आहे. प्रत्येक संघात भारताच्या दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. कर्णधार रोहित शर्माही मुंबई इंडियन्सकडून खेळत आहे. असं असताना त्याला आता वेगळीच चिंता सतवत आहे. भारतीय संघ 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. दरम्यान, आयपीएल स्पर्धा 25 मे रोजी संपणार आहे. इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा 15-20 दिवस आधीच केली जाईल, यात काही शंका नाही. असं असताना टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू दुखापतग्रस्त होण्याची शक्यता आहे. यामुळे कर्णधार रोहित शर्माने खेळाडूंच्या फिटनेसबाबत चिंता व्यक्त केली आहे. खासकरून जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच्या फिटनेससाठी देवाकडे प्रार्थना केली आहे. रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीबाबत ऑस्ट्रेलियाचा दिग्गज मायकल क्लार्कच्या ‘बियॉन्ड 23’ क्रिकेट पॉडकास्टवर चर्चा कली. यावेळी त्याने आपलं मत मांडलं.
रोहित शर्माने सांगितलं की, ‘काही खेळाडूंचं (बुमराह आणि शमी) 100 टक्के फिट असणं महत्त्वाचं आहे. आपल्याला खात्री करायला हवी की ते आयपीएल स्पर्धेतून पूर्णपणे फिट होऊन बाहेर पडतील. कारण हा आव्हानात्मक दौरा आहे.’ आयपीएल स्पर्धा एक आव्हान असल्याचं मत रोहित शर्माने व्यक्त केल्यानंतर पुढेही मुद्यांना हात घातला. ‘मला वाटतं की आयपीएलमध्ये फक्त चार षटकं गोलंदाजी करावी लागते. पण तुम्ही आज सामना खेळता आणि उद्या प्रवास करता. पुन्हा ट्रेनिंग करता आणि खेळता. मला आशा आहे की इतर खेळाडूंसोबत हे दोघेही (बुमराह आणि शमी) कोणत्याही दुखापतीशिवाय आयपीएल संपवतील. जर आमची टीम पूर्णपणे फिट असेल तर आम्ही इंग्लंड दौऱ्यात चांगली कामगिरी करू.’, असंही रोहित शर्मा पुढे म्हणाला.
जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी भारतीय संघातील मुख्य गोलंदाज आहे. भेदक गोलंदाजीमुळे विदेशात त्यांचं संघात असणं खूप महत्त्वाचं आहे. पण मागच्या काही महिन्यात या दोन्ही गोलंदाजांना दुखापतीने ग्रासलं आहे. मोहम्मद शमीने तर वर्षभराचा ब्रेक घेतल्यानंतर कमबॅक केलं आहे. तर जसप्रीत बुमराहला बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेच्या शेवटच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकला होता. आता आयपीएल स्पर्धेच्या मध्यात कमबॅक केलं आहे. जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सकडून, तर शमी सनरायझर्स हैदराबादकडून खेळत आहे.