Congress Leader Sangram Thopte to join BJP : काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. ते काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे म्हटले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार भाजपा प्रवेशासंदर्भात थोपटे यांची केंद्रीय गृहमंत्री अमिता शाहा यांच्यासोबत बैठक झाल्याचेही म्हटले जात आहे.
काँग्रेसचे नेते संग्राम थोपटे हे एकूण तीन वेळा भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत. या मतदारसंघात त्यांचे मोठे प्रस्थ आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवाराकडून पराभूत झाले. थोपटे यांनी भोरमध्ये त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. याच बैठकीत कदाचीत त्यांच्या राजीनाम्याचा निर्णय होऊ शकतो. येत्या रविवारी ते काँग्रेस सदस्यत्व पदाचा राजीनामा देऊ शकतात.
रविवारी राजीनामा दिल्यानंतर ते लवकरच भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. येत्या 22 एप्रिल रोजी ते भाजपात प्रवेश करतील, असे सांगितले जात आहे. मुंबईत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होईल, असेही सांगितले जात आहे.
दुसरीकडे संग्राम थोपटे हे भाजपात जाणार असल्याची चर्चा चालू झाल्यानंतर आता काँग्रेसच्या गोटातही हाचलाची सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे पुण्याच्या जिल्हाध्यक्षांनी पुण्यातील काँग्रेस भवनात एक तातडीची बैठक बोलावली आहे. संग्राम थोपटे यांनी भाजपात प्रवेश केला तर काँग्रेसचे पुण्यात मोठे राजकीय नुकसान होऊ शकते. कारण संग्राम थोपटे यांचे वडील जवळपास सहा वेळा काँग्रेसच्या तिकिटावर आमदार राहिलेले आहेत. संग्राम थोपटे हेदेखील तीन वेळा भोरमधून आमदार राहिलेले आहेत. यंदा त्यांचा पराभव झाला मात्र त्यांचे राजकीय वजन अजूनही कायम आहे. त्यामुळेच थोपटेंच्या भाजपा प्रवेशामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान होऊ शकते.
दरम्यान, थोपटे यांचा भाजपा प्रवेश निश्चित मानला जात असल्याने आता काँग्रेस नेमकं काय करणार? थोपटे यांच्या रुपात होणारे नुकसान काँग्रेस कसे भरून काढणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.