भारतीय क्रिकेट संघासाठी गेले ८ महिने चढ-उतारांचे राहिले आहेत. भारतीय संघाला मायदेशात न्यूझीलंडकडून कसोटी मालिकेत व्हाईटवॉश मिळाला, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धही १० वर्षांनी भारताने कसोटी मालिका गमावली. पण यानंतर नुकतेच मार्चमध्ये भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धाही जिंकली.
या सर्व गोष्टी गौतम गंभीरच्या नेतृत्वातील कोचिंग स्टाफच्या मार्गदर्शनाखाली झाल्या आहेत. आता आयपीएल २०२५ नंतर इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. पण त्याआधी बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
असे समजत आहे की भारतचा सध्याचा सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर याला फक्त ८ महिन्यांनंतर जबाबदारीतून मुक्त करणार आहे. याशिवाय क्षेत्ररक्षक प्रशिक्षक टी दिलीप आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक सोहम देशाई यांनाही त्यांच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात येणार आहे.
टी दिलीप आणि सोहम देसाई गेल्या काही वर्षांपासून भारतीय संघासोबत काम करत होते. तसेच अभिषेक नायरची नियुक्ती जून २०२४ मध्ये करण्यात आली होती.
याशिवाय मिडिया रिपोर्ट्सनुसार सध्याचा सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोईशेट टी दिलीप यांची जागा घेईल. त्यामुळे अद्याप तरी अभिषेक नायर आणि टी दिलीप यांच्या बदली प्रशिक्षकांची नियुक्ती झालेली नाही. सोहम देसाई यांच्या जागेवर दक्षिण आफ्रिकेचे ऍड्रियन ल रुक्स यांची नियुक्ती करण्यात येईल. सध्या ऍड्रियन ल रुक्स पंजाब किंग्ससोबत काम करत आहेत.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगिरी आणि ड्रेसिंग रुममधील गोष्टी लीक झाल्याने बीसीसीआय खूश नाही. त्यामुळे त्यांनी हे मोठे निर्णय घेतले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताला ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत ३-१ अशा फरकाने पराभूत व्हावं लागलं होतं.
त्यानंतर भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यातही सलग तिसऱ्यांदा स्थान मिळवता आले नव्हते. याच दौऱ्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची कामगिरीही अत्यंत सुमार झाली होती. रोहितने ५ डावाच ३१ धावा केल्या होत्या, तर विराटने ९ डावात १९० धावा केल्या होत्या.
दरम्यान, असेही समजत आहे की अभिषेक नायरचे कोलकाता नाईट रायडर्सची कनेक्शन असल्याने बीसीसीआय नाराज आहे. त्यामुळे त्याचे पद धोक्यात आले. नायक आणि डोईशेट हे दोघेही आयपीएलमध्ये यापूर्वी कोलकाताचे सहाय्यक प्रशिक्षक होते.
तसेच त्यांनी कोलकाताकडून गंभीरसोबत कामही केले होते. तथापि, याबाबत अद्याप बीसीसीआयने अधिकृत माहिती दिलेली नाही.