रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु फ्रेंचायझीवर आयपीएल जेतेपदावरून सोशल मीडियावर बरंच काही मीम्स वगैरे तयार होत असतात. क्रीडाप्रेमींमध्ये वादही रंगतात. पण आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि उबेर यांच्यात एका नव्या वादाला फोडणी मिळाली आहे. हा वाद एका जाहीरातीवरून झाला आहे. या जाहीरातीत सनरायझर्स हैदराबादकडून खेळणारा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटून ट्रेव्हिस हेड दिसत आहे. आरसीबीच्या मते, या जाहीरातीत खिल्ली उडवताना ‘Royally Challenged Bengaluru’ असा उल्लेख केला गेला आहे. पण उबेर इंडियाला ही मस्करी चांगलीच महागात पडणार असं दिसत आहे. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आता उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. आयपीएल फ्रेंचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने याचिका दाखल करताना नमूद केलं की, जाहीरातीत केलेल्या शब्दप्रयोगामुळे ब्रँडची इमेज खराब झाली आहे. या शब्द प्रयोगामुळे थेट फ्रेंचायझीच्या ट्रेडमार्कवर हल्ला केला आहे. जाहीरातीत असा उल्लेख खिल्ली उडवण्याच्या हेतूनेच केला असावा, असंही आरसीबीने याचिकेत म्हंटलं आहे.
या जाहीरातीत आरसीबीच्या नावासोबत थट्टा मस्करी केली नाही तर फ्रेंचायझीच्या स्लोगनचीही खिल्ली उडवली आहे. Ee Saala Cup Namde या घोषवाक्याचाही हासं केलं आहे. आरसीबीच्या मते हे घोषवाक्य संघ आणि टीमच्या फॅन्ससोबत भावनिकरित्या जोडलं गेलं आहे. त्यामुळे अशा पद्धतीने व्यंगात्मक पद्धतीने त्याचा वापर केल्याने फॅन्स आमि फ्रेंचायझीच्या छबीला धक्का बसला आहे. जाहीरातीवरून आरसीबी आणि उबेर इंडिया यांच्यातील वाद विकोपाला जाणार असंच दिसत आहे.
दुसरीकडे, उबेर इंडिया या प्रकरणी काय उत्तर देतं याकडेही लक्ष लागून आहे. उबेर इंडिया या प्रकरणावर आपलं मत मांडून बाजू सावरणार का? त्यामुळे आयपीएल सामन्यांप्रमाणे या प्रकरणाची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. आरसीबी यावेळी चांगली कामगिरी करून असून टॉप 4 मध्ये आहे. त्यामुळे प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल असं दिसत आहे. पण या जाहीरात प्रकरणावरून नव्या वादाला वळण मिळालं आहे.
आरसीबीने कोर्टात आपली बाजू भक्कमपणे मांडली आणि कोर्टात सिद्ध करून दाखवलं तर उबेर इंडियाला ही जाहीरात बंद करावी लागेल. तसेच माफीही मागावी लागेल. आता उबेर इंडिया या प्रकरणावर काय प्रतिक्रिया देते आणि दिल्ली कोर्टात याबाबत काय निकाल लागतो? याकडे लक्ष लागून आहे.