Ambadas Danve : छत्रपती संभाजीनगरातील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जातं. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर जाहीर नाराजी व्यक्त केली होती. हा वाद घेऊन खैरे थेट मातोश्रीपर्यंत गेले होते. दरम्यान, आता हा वाद मिटला असल्याचं खैरेंनीच स्पष्टीकरण दिलं होतं. तरीदेखील या दोन्ही नेत्यांमध्ये पूर्मपणे समेट घडून आली नसल्याचा दावा केला जातो. असे असतानाच आता अंबदास दानवे यांनी खैरेंबद्दल प्रश्न विचारताच संताप व्यक्त केलाय. त्यांनी आम्ही आमच्या पक्षाला पाहण्यास सक्षम आहोत. कृपया काड्या करणं बंद करावं, असं संतापून म्हटलंय.
अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगरात एक पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी चंद्रकांत खैरे या पत्रकार परिषदेसाठी का उपस्थित नाहीत, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना दानवे चांगलेच संतापले. “मला वाटतं तुम्ही काड्या करणं बंद करा. मी स्पष्टपणे सांगतो. ही शिवसेना नेत्यांची बैठक आहे. काल-परवा खैरे साहेबांनी सगलं सांगितलेलं आहे. मी तर काहीही बोललेलो नाही. काड्या करणं बंद करावं. मी हात जोडून विनंती करतो. आम्ही आमच्या पक्षाला पाहण्यास सक्षम आहोत,” असं म्हणत दानवेंनी राग व्यक्त केला. तसेच पत्रकारांनी बातम्या छापायच्या असतील तर छापाव्या नाहीतर छापू नये. एवढं स्पष्टपणे मी सांगत आहे. आम्ही माहिती द्यायला आलो आहोत, असंही दानवे संतापात म्हणाले.
दरम्यान, 16 एप्रिला रोजी नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात खैरे यांनी सबुरीची भूमिका घेत वाद मिटला, असं म्हटलं होतं. मराठवाड्यातील मेळावा छोटा होता त्यामुळे कदाचित त्यांनी मला बोलावलं नाही. मी दोन पावलं मागे यायला तयार आहे. दानवेंनी भाषणात जे म्हटलं ते प्रत्यक्षात केलं तर संघटना वाढीस मदत होईल, असं खैरे म्हणाले होते. तसेच माझ्याकडून तर कोणताही वाद नाही. मी खैरे यांचे दर्शन घेतले, असे म्हणत आमच्यात कोणताही वाद नसल्याचं दानवे यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं होतं.