अजितदादा-शरद पवार एकत्र येणार का? तटकरेंनी नेमकं सांगितलं; म्हणाले पांडुरंगाकडे…
GH News April 17, 2025 08:23 PM

Ajit Pawar And Sharad Pawar : अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाची दोन शकलं झाली. त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवली. महाराष्ट्रातील हे दोन्ही मोठे नेते राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या मार्गांवर असले तरी आगामी काळात ते एकत्र येणार का? असे नेहमीच विचारले जाते. यावरच आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे बडे नेते सुनिल तटकरे यांनी भाष्य केलंय. ते पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी आले होते.

अशा प्रकारची मागमी करण्याचं कारण नाही- तटकरे

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सहकुटुंब श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. मंदीर समितीच्या वतीने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेची प्रतिकात्मक मूर्ती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना देण्यात आली. तसेच मंदीर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी तटकरे यांचा सत्कार केला. दर्शन घेतल्यानंतर तटकरे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्यासाठी तुम्ही काही साकडं घातलं का? असा प्रश्न तटकरे यांना विचारला. यावर बोलताना “पांडुरंगाकडे अशा प्रकारची मागणी करण्याचं काही कारण येतच नाही. अजितदादा पवार यांच्या नेतृत्त्वाखाली मी, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ असे आम्ही सर्वांनी मिळून एनडीएसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आता मोदी साबहेबांच्या, अमित भाईंच्या नेतृत्त्वाखाली उद्याच्या भविष्यासाठी राजकीय दृष्ट्या काम करणार आहोत. यात आम्हाला यश मिळत राहो,” अशी स्पष्ट भूमिका तटकरे यांनी मांडली.

अजित पवार काय म्हणाले होते?

शरद पवार आणि अजित पवार हे सध्या राजकीय दृष्टीने एकमेकांचे विरोधक आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांनी केलेल्या विधानांमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेले आहे. अजित पवार यांनी एका सभेत बोलताना शरद पवार यांची स्तुती केली होती. शरद पवार माझे कालही दैवत होते, आजही आहेत, असे अजित पवार म्हणाले होते. त्यानंत छगन भुजबळ यांनीदेखील शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही नेते मला आदरस्थानी आहेत, असे म्हणत कृतज्ञता व्यक्त केली होती.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.