संजीव निंबाळकरांच्या भूमिकेवर मविआच्या खासदार,आमदारांचे मौन का? शहाजी बापूंचा थेट सवाल
Marathi April 18, 2025 05:31 PM

शाहाजी बापू पाटील संजीवराजे निम्बलकर चालवतात : दुष्काळी भागातील पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटू लागलाय. अशातच राज्यातील महायुती सरकारने माळशिरस सांगोला आणि पंढरपूरच्या काही भागांना नीरा उजव्या कालव्याचे मंजूर केलेले पाणी देण्यास फलटणच्या संजीव नाईक निंबाळकर (Sanjeevraje Naik Nimbalkar) यांनी जाहीर विरोध केला आहे. याच्या विरोधात आता आमदार शहाजी बापू (Shahaji Bapu Patil) यांनी जोरदार आघाडी उघडली असून दुष्काळी भागाला पाणी मिळण्यास विरोध करणारे संजीव निंबाळकर यांच्या विरोधात खासदार धैर्यशील मोहिते पाटील, शेकाप आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख आणि ठाकरे गटाकडून निवडणूक लढविलेले दीपक साळुंखे पाटील यांनी मौन का धरले? संजीव निंबाळकर यांच्या वक्तव्याला दोन दिवस उलटूनही अजून त्याला विरोध कसा केला नाही? असा सवाल शहाजी बापूंनी केला आहे. आज चीकमहुद येथे शेतकऱ्यांच्या वतीने माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

दुष्काळी जनतेच्या तोंडून पानी काढून ते परत फलटण, बारामतीकडे वळवायचंय का?

दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी राज्याच्या कॅबिनेटने निर्णय घेतला असून त्याला मंजुरी दिली आहे. नक्कीच जलसंपदा मंत्र्यांसोबत पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीत निंबाळकर आणि आपली बैठक झाली असून तातडीने या संदर्भातले टेंडर काढले जाणार आहेत. वास्तविक निरा उजवा कालव्यातून मिळणारे पाणी हे फलटणमध्ये देऊन उरलेले पाणी असून आता हे पाणी महाविकास आघाडीच्या नेत्यांना दुष्काळी जनतेच्या तोंडून काढून परत फलटण आणि बारामतीकडे वळवायचे आहे का? असा जाहीर सवाल ही  शहाजीबापू यांनी केला.

जरी माझा पराभव झाला असला तरी…

जरी माझा पराभव झाला असला तरी मी जनतेच्या प्रत्येक प्रश्नासाठी संघर्ष करणार असून दुष्काळी भागाच्या हक्काचे पाणी आम्ही मिळवणारच असा दावा ही शहाजी बापूंनी केलाय. स्वर्गीय गणपतराव देशमुख अतिशय हुशार होते. मात्र कायम विरोधी बाकावर बसल्याने त्यांचा तालुक्याला कोणताही फायदा झाला नसल्याचे शहाजी बापूंनी सांगितले. याही वेळी विरोधी आमदाराला निवडून दिल्याने तालुक्याचे नुकसान होत असले तरी मी पराभूत होऊनही दुष्काळी जनतेला पाणी मिळवून देणार, असा विश्वास माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी  बोलून दाखवला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.