Chandrapur Discovery : चंद्रपुरात दुर्मीळ स्टेगाडॉन हत्तीचे जीवाश्मे आढळली; भूशास्त्र संशोधक प्रा.सुरेश चोपणे यांचा दावा
esakal April 18, 2025 06:45 PM

चंद्रपूर : वर्धा-पैनगंगा नदीच्या पात्रात २५,००० ते १२००० वर्षा दरम्यान विदर्भात विचलन करणारे आणि आज लुप्त झालेल्या दुर्मीळ स्टेगाडॉन हत्तीचे जीवाश्मे येथील भूशास्त्र संशोधक प्रा.सुरेश चोपणे यांनी नुकतीच शोधली आहे. महाराष्ट्रात अशा प्रकारची प्लेईस्टोसीन काळातील मिळालेली हत्तीची ही दुर्मीळ जीवाश्म असल्याचा दावा प्रा. चोपणे यांनी केला आहे.

ही जीवाश्मे प्लेईस्टोसीन काळातील आणि जवळजवळ २५००० वर्षादरम्यान विदर्भात वास्तव्य करणाऱ्या स्टेगोडॉन गणेश हत्तीची आहेत. हत्तीच्या दातावरून ही लुप्त झालेल्या स्टेगाडॉन हत्तीची आहेत असे मत अनेक परदेशी संशोधक तसेच वाडिया इंस्टीट्युट ऑफ हिमालयन जीओलॉजीचे निवृत्त प्राध्यापक आणि संशोधक अविनाश नंदा यांनी व्यक्त केले आहे.

हे हत्ती २३ ते २६ हजार वर्षापूर्वी लुप्त झाले. आजचे आशियायी हत्तींचे हे पूर्वज होते. त्याच ठिकाणी एलेफास नामाडीकस ( Elephas Namadicus) लुप्त झालेल्या हत्ती सदृश्य डोके सुद्धा आढळले. त्यामुळे हत्ती जीवाश्मांचेचे सविस्तर विश्लेषण करण्याची गरज असल्याचे मत संशोधक प्रा सुरेश चोपणे यांनी व्यक्त केले आहे.

संपूर्ण कोरोना काळात चंद्रपूर तालुक्यातील वर्धा नदीवर सर्वेक्षण सुरू असतानाच २०२१-२२ मध्ये वरोरा तालुक्यातील वर्धा नदीपात्रात भागात विशाल काय येलीफास नामाडिकस सदृश्य हत्तींची जीवाश्मे आढळली. त्यांचे वर्धा नदीवरील संशोधन हे २०२४-२५ मध्ये पूर्ण झाले.

मिळालेली जीवाश्मे

सापडलेल्या जीवाश्म अवशेषात हत्तीच्या मांडीची हाडे, दात आणि डोक्याची कवटी, छातीची हाडे अशा अवयवांचा समावेश आहे. अजून हत्तीची दोन लांब सुळे दात मिळाली नसली तरी एक तुकडा मात्र मिळाला आहे. गेल्या दोन-तीन दशकापासून ही जीवाश्मे नदीच्या पुरामुळे वाहून गेली. अजूनही काही ठिकाणी सजीवांची जीवाश्मे जमिनीत दडलेली आहेत. स्टेगोडॉन हत्तीची जीवाश्मे मिळण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच वेळ असल्याचे प्रा. चोपणे यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.