श्रीगोंदे : संत शेख महंमद महाराज हे कोणत्या एका समाजाचे नसून ते संपूर्ण भारतीयांचे आहेत. त्यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम थांबवणे उचित नाही. हे काम लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करू, अशी भूमिका ज्येष्ठ समाजप्रबोधनकार बंडतात्या कराडकर यांनी मांडली.
येथील संत शेख महंमद महाराज मंदिराच्या जीर्णोद्धारातील अडथळे दूर करण्याच्या मागणीसाठी शहरवासीयांनी गुरुवारी (ता.१७) टाळ-मृदंगाच्या गजरात मोर्चा काढला. त्याचबरोबर कडकडीत बंद पाळून तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. कराडकर म्हणाले, हा वारकरी संप्रदायाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. संत शेख महंमद महाराज हे वारकरी संप्रदायाचे होते. याचे पुरावे नष्ट कराल. मात्र, गाथा कशी नष्ट करणार. प्रशासनाने हा प्रश्न लांबणीवर टाकू नये. बेमुदत धरणे धरण्याचा प्रसंग आणू नका. लवकरात लवकर मंदिर जीर्णोद्धार सुरू व्हावा.
माणिक महाराज मोरे म्हणाले, कदाचित काहींना संत शेख महंमद महाराज कळालेच नसावेत. त्यामुळे ते वेगळी भूमिका घेत आहेत. संतांच्या रचना ही त्यांची स्पंदने आहेत. त्यांच्या समाधीपुढे नतमस्तक झालात, तर ती स्पंदने ऐकायला येतील. येथील मंदिर जीर्णोद्धाराचे काम आता थांबता कामा नये. श्रीगोंदेकरांच्या भूमिकेला देहू संस्थान व वारकरी संप्रदायाच्या वतीने पाठिंबा देतो.
खासदार नीलेश लंके म्हणाले, या प्रकरणात प्रशासनाने बघ्याची भूमिका घेऊ नये. एका व्यक्तीमुळे काम रखडले आहे. समाजाच्या भावना लक्षात घेऊन त्यांच्याशी चर्चा करा आणि मंदिर जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा करून द्या.
आमदार विक्रम पाचपुते म्हणाले, मंदिर जीर्णोद्धारासाठी सर्वांची ठाम भूमिका आहे. मात्र, हा प्रश्न संयमाने हाताळावा लागेल. याबाबत आपण शासन स्तरावर पाठपुरावा करून सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे निर्णय घेण्यासाठी प्रयत्न करू. माजी मंत्री बबनराव पाचपुते, रा जेंद्र नागवडे, बाळासाहेब नाहाटा, बाबासाहेब भोस, मनोहर पोटे, प्रणोती जगताप, राजेंद्र म्हस्के, टिळक भोस, अरविंद कापसे, जब्बार शेख आदींनी भूमिका मांडली. गोपाळराव मोटे, शुभांगी पोटे, बापू गोरे, अशोक खेंडके, सुनीता शिंदे, ज्योती खेडकर, मीरा शिंदे, मीरा खेंडके आदी उपस्थित होते. घनश्याम शेलार यांनी प्रास्ताविक केले.
कडेकोट पोलिस बंदोबस्तपोलिस प्रशासनाने खबरदारीसाठी अतिरिक्त पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्या नियंत्रणाखाली मोठा बंदोबस्त तैनात केला होता. यामध्ये तीन पोलिस उपअधीक्षक, चार पोलिस निरीक्षक, दहा अधिकारी, साठ पोलिस कर्मचारी व दोन दंगल नियंत्रण पथकांचा यामध्ये समावेश होता.